For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोलगाव विद्यालयाचे ५ विद्यार्थी स्काऊट गाईड राज्य पुरस्काराचे मानकरी

01:21 PM Mar 02, 2025 IST | अनुजा कुडतरकर
कोलगाव विद्यालयाचे ५ विद्यार्थी स्काऊट गाईड राज्य पुरस्काराचे मानकरी
Advertisement

महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या हस्ते होणार सन्मान

Advertisement

ओटवणे | प्रतिनिधी
डिसेंबर २०२४ मधे घेण्यात आलेल्या स्काऊट - गाईडच्या राज्य परीक्षेत कोलगाव माध्यमिक विद्यालयाच्या अभिनव उल्हास जाधव, अभिजीत अजित सावंत, अन्वय संतोष सावंत, राज लक्ष्मण परब, पार्थ प्रदीप राऊळ या पाच विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश मिळवत स्काऊटच्या राज्य पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. हा स्काऊट राज्य पुरस्कार सन्मान या पाचही विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या राज्यपालांच्याहस्ते प्रदान करण्यात येणार आहे. तसेच हे पाचही विद्यार्थी आता राष्ट्रपती पुरस्कार परीक्षेसाठीही पात्र ठरले आहेत. या पाचही विद्यार्थ्यांनी कोलगाव विद्यालयात स्काऊट राज्य पुरस्कार अभ्यासक्रम पूर्ण करून महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स आणि गाईड्स यांच्यावतीने सोनतळी - कोल्हापूर येथे झालेल्या राज्य पुरस्कार चाचणी शिबिरात परीक्षा दिली. त्यासाठी स्काऊट राज्य पुरस्कार अभ्यासक्रमावर आधारित तोंडी, लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आल्या. या सर्व परीक्षात या विद्यार्थ्यानी यश मिळवून स्काऊट राज्य पुरस्कार प्राप्त केला. हा स्काऊट राज्य पुरस्कार सन्मान महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्याहस्ते या विद्यार्थ्यांना प्रदान केला जाणार आहे.कोलगाव हायस्कूलच्या इतिहासातील ही पहिलीच सर्वोत्तम शैक्षणिक कामगिरी आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे कोलगावचे नाव उंचावले आहे. या विद्यार्थ्यांना कोलगाव विद्यालयाचे स्काऊट मास्टर अरविंद मेस्त्री, सिंधुदुर्ग भारत स्काऊट गाईड संस्थेचे जिल्हा संघटक सोमनाथ गायकवाड ( स्काऊट), अंजली माहुरे (गाईड) यांनी मार्गदर्शन केले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.