दहावी परीक्षा शुल्कात 5 टक्के वाढ
बेंगळूर : राज्यातील दहावी वार्षिक परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात 5 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहेत. यासंबंधी कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने आदेश जारी केला आहे. दहावी परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून दरवर्षी 5 टक्के वाढीव शुल्क आकारण्याचा आदेश सरकारने दिला आहे. त्यानुसार 2025-26 सालातील परीक्षेच्या नोंदणीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून सध्या असणाऱ्या शुल्कात 5 टक्के वाढीव शुल्क समाविष्ट करून आकारणी करावी, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाने आदेश दिला आहे.
प्रथमच दहावी परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या (सीसीईआरएफ आणि सीसीईपीएफ) विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात 676 रुपयांवरून 710 रु. पर्यंत वाढ झाली आहे. नव्याने नोंदणी करणाऱ्या बहिस्थ विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क 236 रु. वरून 248 रु. पर्यंत वाढले आहे. तर अलीकडेच नोंदणी करून शुल्क भरलेल्या बहिस्थ विद्यार्थ्यांचे नेंदणी नूतनीकरण शुल्क 69 रुपयांवरून 72 रु. पर्यंत वाढविण्यात आले आहे. तर रिपीटर्स, बहिस्थ विद्यार्थ्यांना एका विषयासाठी असणारे 427 रु. शुल्क आता 448 रुपये इतके वाढविण्यात आले आहे. दोन विषयांसाठी 532 रु. वरून 559 रु. तसेच तीन किंवा त्यापेक्षा अधिक विषयांसाठी असणारे परीक्षा शुल्क 716 रु. वरून 752 रु. पर्यंत वाढविण्यात आले आहे.