अल्पवयीन मुलीला वाचविण्याच्या प्रयत्नात 5 जण बुडाले
आंध्रप्रदेशच्या तुंगभद्रा नदीत मोठी दुर्घटना
वृत्तसंस्था/ मंत्रालयम
आंध्रप्रदेशच्या कर्नूल जिल्ह्यातील मंत्रालयम येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. तेथे तुंगभद्रा नदीत बुडत असलेल्या एका अल्पवयीन मुलीला वाचविण्याच्या प्रयत्नात 5 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. शनिवारी संध्याकाळी सुमारे 4.30 वाजता मुलगी नदीत स्वत:चे पाय स्वच्छ करत असताना तिचे संतुलन बिघडून ती वेगवान प्रवाहात वाहून जाऊ लागली होती. तिला वाचविण्यासाठी नदीत 5 जणांनी उडी घेतली होती.
या घटनेत मुलीला वाचविण्यात आले, परंतु तिला वाचविण्यासाठी नदीत उडी घेतलेले 5 जण मृत्युमुखी पडले आहेत. मृत लोक आसपासच्या गावांचे रहिवासी होते अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. स्थानिक पोलिसांनी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या टीम्सच्या मदतीने मृतदेहांचा शोध घेत ते नदीतून बाहेर काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. नदीची पातळी आणि वेगवान प्रवाह पाहता प्रशासनाने लोकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे.