For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

बेंगळूर स्फोट प्रकरणी 5 जण ताब्यात

06:04 AM Mar 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेंगळूर स्फोट प्रकरणी 5 जण ताब्यात

एनआयएची तामिळनाडूत धडक कारवाई : तपास वेगाने करण्याचा निर्धार

Advertisement

वृत्तसंस्था / बेंगळूर

बेंगळूर येथील कॅफे रामेश्वरम येथे झालेल्या स्फोटाचा तपास स्वत:च्या हाती घेतल्यानंतर राष्ट्रीय अन्वेषण प्राधिकरणाने (एनआयए) जोरदार कारवाईला प्रारंभ केला आहे. तामिळनाडूत अनेक स्थानांवर मंगळवारी या प्राधिकरणाने धाडी घातल्या. पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असल्याचे वृत्त आहे.

Advertisement

तामिळनाडूची राजधानी चेन्नई आणि अन्य शहर कुडालूर येथे 9 स्थानांवर धाडी घालण्यात आल्या आहेत. या स्फोटात लष्कर ए तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या स्फोटाचा तपास एनआयएच्या हाती देण्यात आला. या संघटनेचा दक्षिण भारतातील म्होरक्या थादियंताविदा नसीर याने बेंगळूरमधील काही युवकांना दहशतवादाचे प्रशिक्षण दिल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारावर या धाडी घालण्यात आल्या आहेत. चौकशी वेगाने करण्यात येत आहे.

Advertisement

उक्काडम स्फोटाशी साधर्म्य

ऑक्टोबर 2022 मध्ये तामिळनाडूतील कोईंबतूर येथील उक्काडम या उपनगरातील संगमेश्वर मंदिरात स्फोट घडविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तथापि, निर्धारित वेळेआधी स्फोट झाल्याने त्या स्फोटात स्फोट घडविण्यासाठी गेलेला दहशतवादीच ठार झाला होता. त्याचे नाव जमीशा मुबीन असे होते. बेंगळूर येथे झालेल्या स्फोटाशी या स्फोटाचे साधर्म्य दिसून आल्याने तामिळनाडूवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. आणखी धाडी पडण्याची शक्यताही आहे.

स्फोटातील जखमींवर उपचार सुरू

बेंगळूर येथे झालेल्या स्फोटात कॅफेमधील 10 जण जखमी झाले होते. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. ज्याने स्फोट घडविला त्याचे सीसीटीव्ही फूटेजही मिळाले आहे. मात्र, या फूटेजमध्ये त्याचा चेहरा स्पष्टपणे दिसून येत नाही. त्याने तोंडावर मास्क लावल्याने त्याची ओळख पटविण्यात अडचण येत आहे.

Advertisement
Tags :
×

.