बस दरीत कोसळून गुजरातमध्ये 5 ठार
त्र्यंबकेश्वर दर्शनाहून परतताना दुर्घटना : 35 भाविक जखमी, 17 गंभीर
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
गुजरातमधील डांग जिल्ह्यात यात्रेकरूंना घेऊन जाणारी एक खासगी बस खोल दरीत कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला. तसेच बसमधील 35 जण जखमी झाले असून 17 जण गंभीर असल्याची माहिती देण्यात आली. हे भाविक मध्यप्रदेशातील गुना, शिवपुरी आणि अशोकनगर जिह्यातील होते. मध्यप्रदेशमधील पर्यटक व भाविकांना महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर येथे दर्शन देऊन परतताना ही दुर्घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे 4.15 च्या सुमारास हा अपघात झाला. सापुतारा हिल स्टेशनजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळली. ही बस 48 यात्रेकरूंना घेऊन त्र्यंबकेश्वरहून गुजरातमधील द्वारका येथे जात होती.
मध्यरात्रीनंतर बस सापुतारा येथे थांबली होती. येथे त्यांनी चहा आणि नाश्ता घेतल्यानंतर प्रवास पुन्हा सुरू झाला. याचदरम्यान पहाटेच्या सुमारास ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळल्याचे डांगचे जिल्हाधिकारी महेश पटेल यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील शिवपुरी, गुना आणि अशोकनगर जिह्यातील भाविकांचा एक गट 23 जानेवारी रोजी धार्मिक यात्रेसाठी निघाला होता. हे लोक उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमधील वेगवेगळ्या तीर्थस्थळांना भेट देत होते. एकूण चार बसमध्ये यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसपैकी एका वाहनाला अपघात झाला.