Solapur railway | सोलापूर रेल्वे स्थानकावर गुरुवारी ५ तासांचा 'ट्रॅफिक ब्लॉक'; अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
विजापूर-रायचूर पॅसेंजर सोलापूरला येणार नाही
सोलापूर: सोलापूर रेल्वे स्थानकावर स्टेबलिंग सायडिंग क्रमांक १ व २ कार्यान्वित करण्यासाठी सिग्नल व दूरसंचार विभागामार्फत विशेष काम हाती घेण्यात आले असून, यासाठी गुरुवारी (दि.९) रोजी ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे अनेक गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार असून काही गाड्यांचे मार्गांतर तर काही गाड्या उशिराने धावणार आहेत. या कामामुळे विजापूर-रायचूर व रायचूर-विजापूर पॅसेंजर ही होटगीपर्यंतच धावणार असून पुढील प्रवास होटगी येथूनच सुरू करणार आहे. ही पॅसेंजर सोलापूर स्थानकावर येणार नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, ८ एप्रिल रोजी दुपारी ४.१५ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत (१ तास ४५ मिनिटे) प्राथमिक ब्लॉक घेण्यात आला होता. यावेळी काही गाड्या ‘पास ऑन ऑथॉरिटी’ने चालवण्यात आल्या.दरम्यान, गुरुवारी (दि. ९) मुख्य कामासाठी दुपारी १.१५ ते ४.१५ (३ तास) ‘अंडर ट्रॅफिक ब्लॉक’ आणि सायंकाळी ४.१५ ते ६.१५ (२ तास) ‘ट्रॅफिक ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. या काळात गाडी क्रमांक ५७६६२ विजापूर-रायचूर पॅसेंजर ही होटगी-सोलापूर दरम्यान धावणार नाही. ही गाडीविजापूर-होटगी-वाडी मार्गे वळवण्यात आली आहे.
तसेच ५७६६१ रायचूर-विजापूर पॅसेंजरही वाडी-होटगी मार्गे वळवण्यात येणार असून होटगी-सोलापूर दरम्यान धावणार नाही. तरी प्रवाशांनी प्रवासापूर्वी संबंधित गाड्यांची अद्ययावत माहिती तपासूनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.