5 दिवसांची घसरण थांबली, पण निफ्टीत काहीशी घसरण
सेन्सेक्स 147 अंकांसह तेजीत : जागतिक स्थिती अस्थिरच
मुंबई :
मंगळवारी भारतीय शेअर बाजार महाशिवरात्रीच्या अगोदर एक दिवस अल्पशा तेजीसह बंद होण्यात यशस्वी झाला. 147 अंकांनी सेन्सेक्स वधारत बंद झाला असून गेल्या 5 दिवस सुरु असलेल्या बाजाराच्या घसरणीला अखेर ब्रेक लागला आहे.
मंगळवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 147 अंकांनी वधारत अर्थात 0.20 टक्के इतका वाढत 74,602 अंकांवर बंद झाला. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक मात्र 5 अंकांनी घसरणीसह 22,547 अंकांवर बंद झाला. बुधवारी महाशिवरात्रीनिमित्त शेअर बाजार बंद असणार असून एक दिवस आधी गुंतवणूकदारांनी सावध राहणे पसंत केले होते. सकाळी सेन्सेक्स 74,440 अंकांवर खुला झाला होता. दिवसभरात सेन्सेक्स 300 अंकांच्या तेजीसह कार्यरत होता. पण शेवटी मात्र तेजी काहीशी खाली आली. निफ्टी 50 आणि सेन्सेक्स निर्देशांकाने सप्टेंबरमध्ये विक्रमी स्तर गाठला होता, त्या तुलनेत पाहता सध्याला अनुक्रमे 14 टक्के, 13 टक्के बाजार खाली आले आहेत. अर्थव्यवस्था आणि कंपन्यांच्या डिसेंबरमधील कमकुवत निकालांसह विदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीवर सातत्याने देण्यात येणारा जोर यामुळे बाजार काही दिवसांपासून हेलकावे खात व्यवहार करत आहे. सोबत जागतिक अनिश्चितताही बाजाराला निराश करत राहिली आहे.
बाजारातील कामगिरीवर नजर फिरवल्यास महिंद्रा आणि महिंद्रा, भारती एअरटेल, बजाज फायनान्स, अदानी पोर्टस्, एचडीएफसी लाइफ, टायटन, इंडसइंड बँक, अपोलो हॉस्पिटल, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, नेस्ले इंडिया, मारुती सुझुकी, बजाज फिनसर्व्ह, अदानी एंटरप्रायझेस, आयटीसी, टाटा कन्झ्युमर्स, इन्फोसिस या कंपन्यांचे समभाग तेजीसह बंद झाले आहेत.
हे समभाग घसरणीत
दुसरीकडे बजाज ऑटो, ब्रिटानिया, ओएनजीसी, श्रीराम फायनान्स, सिप्ला, बीपीसीएल, टाटा मोटर्स, हिरो मोटोकॉर्प, ट्रेंट, एशियन पेंटस्, ग्रासिम, टेक महिंद्रा, सनफार्मा, रिलायन्स इंडस्ट्रिज, आयशर मोटर्स, अॅक्सिस बँक, स्टेट बँक, अल्ट्राटेक सिमेंट, लार्सन टुब्रो, टीसीएस, विप्रो यांचे समभाग घसरणीतसोबत बंद झाले.
बुधवारी बाजार बंद
महाशिवरात्रीनिमित्त बुधवारी 26 फेब्रुवारी रोजी शेअरबाजार बंद राहणार आहे. यादिवशी कोणतेही व्यवहार होणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे.