For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara Crime | साताऱ्यात मध्यरात्री सोने लुटणार्‍या टोळीतील ५ आरोपींना १२ तासांत अटक

04:22 PM Mar 03, 2026 IST | NEETA POTDAR
satara crime   साताऱ्यात मध्यरात्री सोने लुटणार्‍या टोळीतील ५ आरोपींना १२ तासांत अटक
Advertisement

                     सातारा शहर पोलीस ठाण्याकडून पुढील तपास सुरू

Advertisement

सातारा - शहरातील पंचायत समिती समोर मध्यरात्री कुरीयरद्वारे सोने घेऊन जाणाऱ्या इसमास अडवून मारहाण करत २१ तोळे सोने लुटणाऱ्या मध्यप्रदेशातील टोळीतील पाच आरोपींना अवघ्या १२ तासांत अटक करण्यात सातारा शहर पोलिसांना यश आले आहे.आरोपींकडून चोरीस गेलेले सर्व सोने, गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन व मोबाईल असा एकूण सुमारे ४५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २८ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे १२.३० वाजता पंचायत समिती समोर कुरीयर कंपनीमार्फत सोने घेऊन जाणाऱ्या व्यक्तीस चारचाकीतून आलेल्या चार जणांनी अडवले. संबंधितास मारहाण करून त्याच्याकडील सोन्याची बॅग जबरदस्तीने हिसकावून आरोपी फरार झाले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला.घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर व उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के व पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी सातारा शहर डी.बी. पथकास तातडीने तपासाच्या सूचना दिल्या.

Advertisement

डी.बी. पथकाने गोपनीय बातमीदारांच्या मदतीने संशयितांची माहिती मिळवून त्यांच्या वाहनाचा पाठलाग सुरू केला. आरोपी जिल्ह्याबाहेर पळाल्याची व ते परराज्यातील असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुढील पोलीस ठाण्यांना सतर्क करण्यात आले.पाठलागादरम्यान धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपींना अटक करण्यात आली.

आरोपींकडून गुन्ह्यातील सर्व सोन्याचा ऐवज, वापरलेले चारचाकी वाहन व मोबाईल जप्त करण्यात आला असून एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे ४५ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत डी.बी. पथकातील अधिकारी व अंमलदार तसेच सायबर पोलीस ठाण्याचा स्टाफ आणि शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. अवघ्या १२ तासांत गुन्हा उघडकीस आणत आरोपींना जेरबंद केल्याने पोलिसांच्या तत्पर कारवाईचे कौतुक होत आहे. पुढील तपास सातारा शहर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे

Advertisement
Tags :

.