जपानमध्ये 5.9 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का
काही भागात पडझड : 20 हून अधिक जण जखमी
वृत्तसंस्था/ टोकियो
जपानमध्ये रविवारी पहाटे जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांनी टोकियोसह आसपासचा परिसर हादरला. या भूकंपाची तीव्रता 5.9 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. या आपत्तीत 20 हून अधिक लोक जखमी झाले, त्यापैकी बहुतेकांना किरकोळ दुखापत झाली. जपान हवामानशास्त्र संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू दक्षिणेकडील इबाराकी प्रांतात 70 किलोमीटर खोलीवर होता. हा प्रदेश वारंवार भूकंपासाठी ओळखला जातो. या भूकंपानंतर अधिकाऱ्यांनी सुनामीचा इशारा दिलेला नसल्याने लोकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
भूकंपामुळे स्थानिक रेल्वेसेवा विस्कळीत झाली. मोबाईल फोनवर आपत्कालीन सूचना जारी करण्यात आल्या. अनेक ठिकाणी भूमिगत पाण्याच्या पाईप फुटल्या. टोकियोमधील अंदाजे 460 घरांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. तथापि, सकाळपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत झाला. पंतप्रधान सनाए ताकाइची यांच्या सरकारने नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी एक कृती दल स्थापन केले आहे.
23 जण जखमी झाल्याचे वृत्त
भूकंपग्रस्त भागातील चार प्रांतांमध्ये 23 जण जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सायतामामध्ये 9, कानागावामध्ये 9, चिबामध्ये 4 आणि इबाराकीमध्ये 1 जण जखमी झाल्याची नोंद झाली आहे. पहाटेच्या वेळी लोक झोपलेले असताना भूकंप झाला. अचानक झालेल्या भूकंपाने घाबरून अंथरुणातून उठताना पडल्याने किंवा दरवाजाला धडकल्याने बहुतेक जण जखमी झाले.
एक्स्प्रेस-लोकल ट्रेनवर परिणाम
भूकंपामुळे रेल्वे सेवेवर परिणाम झाला. ईस्ट जपान रेल्वे कंपनीने टोकियो आणि नारिता विमानतळ दरम्यानच्या एक्स्प्रेस ट्रेन आणि ईशान्येकडील भागातील लोकल ट्रेनला विलंब झाल्याचे कळवले. तथापि, बुलेट ट्रेन सामान्यपणे सुरू होत्या. अणुऊर्जा नियामक प्राधिकरणाने सुमारे डझनभर अणुऊर्जा प्रकल्प आणि अणुऊर्जा सामग्री हाताळणाऱ्या सुविधांमध्ये कोणताही व्यत्यय आल्याचे वृत्त दिले नाही.
