5.8 रिश्टर स्केलचा पाकिस्तानमध्ये भूकंप
काश्मीरमध्येही जाणवले धक्के
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानमध्ये शनिवारी पुन्हा एकदा भूकंप झाला. 5.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के भारतातील काश्मीरपर्यंत जाणवले. भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजता झालेल्या या भूकंपांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या धक्क्यांमुळे घरांपासून ते कार्यालयांमधील बरेचजण बाहेर धावले. या भूकंपाचा केंद्रबिंदू पाकिस्तानातील संजवालपासून 12 किलोमीटर अंतरावर होता. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने (एनसीएस) त्याची तीव्रता 5.8 रिश्टर स्केल असल्याचे निरीक्षण नोंदवले होते. तर, युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेने या भूकंपाची तीव्रता 5.0 रिश्टर स्केल इतकी मोजली. या भूकंपात कोठेही मोठे नुकसान झाल्याची नोंद सायंकाळपर्यंत झाली नव्हती. या भूकंपाचे केंद्र पाकिस्तानात असले तरी, भारतातील काश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. ठीक दुपारी 1 वाजता लोक त्यांच्या दैनंदिन कामात व्यस्त असताना त्यांना अचानक जमिनीखाली झटके जाणवले.