‘अग्निपथ’ योजनेंतर्गत नौदलाकडे 5.62 लाख अर्ज
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय नौदलाला 27 जुलैपर्यंत अग्निपथ योजनेंतर्गत 5.62 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. 27 जुलै रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत एकूण 5 लाख 62 हजार 818 उमेदवारांनी नौदलात नोंदणी केली आहे, असे संरक्षण मंत्रालयाने ट्विट केले. नौदलाने 2 जुलै रोजी या योजनेंतर्गत भरती प्रक्रिया सुरू केली होती. 14 जून रोजी या योजनेचे अनावरण करण्यात आल्यानंतर जवळपास आठवडाभर अनेक राज्यांमध्ये हिंसक निदर्शने झाली आणि अनेक विरोधी पक्षांनी ते मागे घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला होता.
अग्निपथ योजनेंतर्गत 17 ते 23 वयोगटातील तरुणांना चार वर्षांच्या कालावधीसाठी सैन्यात भरती केले जाईल, तर त्यातील 25 टक्के तरुणांची त्यानंतर नियमित सेवेसाठी निवड केली जाईल. सैन्यात भरती होणाऱया या तरुणांना ‘अग्निवीर’ म्हटले जाईल. 16 जून रोजी सरकारने या योजनेअंतर्गत भरतीसाठी 2022 सालासाठी कमाल वयोमर्यादा 21 वरून 23 वर्षे केली होती. याशिवाय, केंद्रीय निमलष्करी दलातील नोकऱया आणि सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण उपक्रमांमध्ये निवृत्तीनंतर अग्निवीरांना प्राधान्य देण्यासारखी पावले जाहीर करण्यात आली होती.