अमेरिकेत 5.5 कोटी व्हिसाधारकांवर टांगती तलवार
ट्रकचालकांच्या व्हिसावर बंदी : भारतीयाकडून झालेल्या भीषण अपघातामुळे निर्णय
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्षपद स्वीकारल्यापासून डोनाल्ड ट्रम्प हे अवैध स्थलांतरितांच्या विरोधात पावले उचलत आहेत. याचदरम्यान अमेरिकेच्या प्रशासनाने आता अमेरिकेचा व्हिसा मिळवत तेथे वास्तव्य करणाऱ्या 5.5 कोटी लोकांसाठी धोक्याची घंटी वाजविली आहे. या 5.5 कोटी व्हिसाधारकांच्या पार्श्वभूमीची समीक्षा केली जात आहे. या लोकांनी इमिग्रेशन नियमांचे उल्लंघन केले आहे का हे तपासले जाणार आहे. नियमांचे उल्लंघन आढळून आल्यास संबंधिताचा व्हिसा रद्द करत त्यांना मायदेशी परतण्यास सांगण्यात येणार असल्याचे अमेरिकेच्या विदेश विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व अमेरिकन व्हिसाधारकांची सातत्याने तपासणी केली जात आहे. संबंधित लोक व्हिसासाठी अयोग्य आहेत का हे पाहिले जात असल्याचे अमेरिकेच्या विदेश विभागाने एका प्रश्नाच्या लेखी उत्तरादाखल सांगितले आहे. आम्ही आमच्या चौकशीच्या हिस्स्याच्या स्वरुपात सर्व उपलब्ध माहितींची समीक्षा करतो. यात कायदा अंमलबजावणी (पोलीस) किंवा इमिग्रेशन रिकॉर्ड किंवा व्हिसा जारी झाल्यावर संभाव्य अपात्रतेचा संकेत देणारी अन्य माहिती सामील असल्याचे विभागाने म्हटले आहे.
नियमांचे उल्लंघन निदर्शनास आले तर संबंधिताला अमेरिकेतून निर्वासित केले जाणार आहे. संबंधिताकडे पर्यटन व्हिसा असला तरीही हे पाऊल उचलले जाणार आहे. विदेश विभागाच्या या नव्या भूमिकेमुळे ज्या लोकाना अमेरिकेत वास्तव्याची अनुमती मिळाली आहे, त्यांची वास्तव्य मंजुरी अचानक रद्द होण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. व्हिसाकालावधीपेक्षा अधिक वास्तव्य, गुन्हेगारी कृत्य, सार्वजनिक सुरक्षेसाठी धोका, कुठल्याही प्रकारच्या दहशतवादी कृत्यात सामील असणे किंवा दहशतवादी संघटनेला समर्थन प्रदान करण्याच्या कृत्यानंतर व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. होमलँड सुरक्षा विभागानुसार मागील वर्षी अमेरिकेत 1.28 कोटी ग्रीनकार्ड धारक आणि 36 लाख लोक तात्पुरत्या व्हिसावर होते.
विदेशी ट्रकचालकांच्या व्हिसाला स्थगिती
अमेरिकेने सर्व विदेशी ट्रकचालकांसाठी व्हिसा जारी करणे त्वरित बंद केले आहे. आम्ही तत्काळ प्रभावाने वाणिज्यिक ट्रकचालकांसाठी व्हिसा जारी करण्यावर बंदी घालत आहोत असे अमेरिकेचे विदेशमंत्री मार्को रुबियो यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत जाहीर केले आहे. वर्कर व्हिसा रोखण्यामागील कारण भारतातून अवैध मार्गाने अमेरिकेत पोहोचलेल्या हरजिंदर सिंहचे कृत्य कारणीभूत ठरले आहे. हरजिंदरने स्वत:च्या एका चुकीमुळे भीषण दुर्घटना घडविली अणि यामुळे अमेरिकेत तीन जणांना जीव गमवावा लागला आहे.
का घेण्यात आला निर्णय
अमेरिकन गृह सुरक्षा विभागाकडून हरजिंदर सिंहविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आल्यावर विदेशमंत्र्यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे. हरजिंदर सिंह नावाच्या अवैध स्थलांतरिताने 12 ऑगस्ट रोजी केवळ अधिकृत वापरासाठी असलेल्या एंट्री पॉइंटवरून अवैधपणे यू-टर्न घेण्याचा प्रयत्न केला, यामुळे त्याच्या ट्रकने महामार्गावरील सर्व मार्गिकांवरील वाहतूक रोखली आणि यामुळे भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 3 जणांना जीव गमवावा लागला होता. तसेच दुर्घटनेनंतर हरजिंदर सिंह इंग्रजी भाषेत बोलू न शकल्याने स्थानिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला होता.