कणकवलीत 49 वी नाथ पै एकांकिका स्पर्धा; शालेय गटासाठी 10 हजार, खुल्या गटासाठी 30 हजारांचे प्रथम पारितोषिक
यंदाही स्पर्धेचे आयोजन शालेय आणि खुल्या अशा दोन गटांत करण्यात आले आहे. 24 व 25 डिसेंबर रोजी शालेय गटाच्या, तर 26,27 आणि 28 डिसेंबर रोजी खुल्या गटाच्या एकांकिका सादर होणार आहेत.
खुल्या गटासाठी 30 हजारांचे प्रथम पारितोषिक
स्पर्धेतील पारितोषिके आकर्षक असून शालेय गटात प्रथम क्रमांकासाठी 10 हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 7 हजार 500 रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी 5 हजार रुपये रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे.
खुल्या गटात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या संघाला 30 हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 15 हजार रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी 10 हजार रुपये रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय दिग्दर्शन, तांत्रिक आणि अभिनय विभागांसाठी स्वतंत्र रोख पारितोषिके व स्मृतिचिन्हे देण्यात येणार आहेत.
2 डिसेंबरपर्यंत प्रवेश नोंदणीची संधी
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शालेय गटाकरिता एक हजार रुपये, तर खुल्या गटाकरिता दोन हजार रुपये प्रवेश शुल्क निश्चित करण्यात आले आहे. प्रवेश अर्ज व शुल्क भरण्याची अंतिम तारीख 2 डिसेंबर 2026 आहे. इच्छुक नाट्यसंघांनी प्रतिष्ठानच्या गुगल फॉर्मद्वारे प्रवेश नोंदणी पूर्ण करावी.
नाथ पै एकांकिका स्पर्धा ही महाराष्ट्रातील हौशी रंगभूमीला अनेक वर्षांपासून प्रोत्साहन देणारी आणि नवोदित कलावंतांना आपली कला सादर करण्याची संधी देणारी महत्त्वपूर्ण सांस्कृतिक परंपरा आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या या स्पर्धेचे यंदाचे वर्ष विशेष उत्साहात साजरे करण्याचा प्रतिष्ठानचा मानस आहे.
अधिक माहितीसाठी व प्रवेश नोंदणीसाठी प्रतिष्ठानचे कार्यवाह शरद सावंत यांच्याशी 9422584054 किंवा 8830180885 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा.
