रोहानजीक वणव्यात 48 घरे बेचिराख
खेड :
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील इंदरदेव-धनगरवाडी येथे गुरुवारी रात्रीच्या सुमारास लागलेल्या वणव्यात तब्बल 48 घरे बेचिराख झाली. दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी लाखोंची वित्तहानी झाली आहे. आगीत धनगरवाडीतील ग्रामस्थांचे संसार उद्ध्वस्त झाल्याने सर्व कुटुंबिय आपल्या नातेवाईकांकडे आसऱ्याला गेले आहेत. वणवा लागण्याचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
इंदरदेव-धनगरवाडी येथे गुरुवारी सायंकाळी जंगलमय भागात लागलेला वणवा रात्रीच्या सुमारास घरापर्यंत पोहचला. वणवा वस्तीपर्यंत येत असल्याचे वाडीतील ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्यांनी आरडाओरडा सुरू झाला. या आरडाओरड्याने वाडीतील सर्वच ग्रामस्थ घराबाहेर पडले. तोपर्यंत वणव्याने धनगरवाडीला वेढले होते. वणव्याने रौद्ररुप धारण केल्याने ग्रामस्थांचे सारे प्रयत्न फोल ठरले. वणव्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी रोहा अग्निशमक दलास पाचारण करण्यात आले. एसव्हीआरएस बचाव पथकांसह रोहा पोलीस यंत्रणा व स्थानिक मदतकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी पोहचून वणवा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु वणवा आटोक्यात येईपर्यंत धनगरवाडीतील 48 घरे जळून खाक झाली. या दुर्घटनेने इंदरदेव-धनगरवाडी पूर्णत: उद्ध्वस्त झाली आहे. वणवा लागला की लावला, याचा शोध रोहा पोलिसांकडून घेण्यात येत आहे.