For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

शॉर्टसर्किटमुळे 48 एकरमधील ऊस जळून खाक

06:35 AM Oct 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
शॉर्टसर्किटमुळे 48 एकरमधील ऊस जळून खाक
Advertisement

खानापूर तालुक्यात एकाच दिवशी तीन ठिकाणी दुर्घटना : कान्सुली येथे 25 एकर,

Advertisement

गणेबैलमधील 15 तर रामगुरवाडी येथील 8 एकर ऊस पिकाचे नुकसान

प्रतिनिधी/ खानापूर

Advertisement

खानापूर तालुक्यातील कान्सुली येथे 25 एकर ऊसपीक जळून खाक झाल्याची घटना ताजी असतानाच सोमवार दि. 26 रोजी गणेबैल येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे 15 एकरमधील ऊस पीक जळून खाक झाले. या आगीमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्याची मागणी होत आहे.

गणेबैल-काटगाळी रस्त्यावर असलेल्या उसाच्या फडात सोमवारी दुपारी उच्च दाबाचा वीजपुरवठा झाल्याने वीज वाहिन्या एकमेकांवर घासून पडलेल्या ठिणगीमुळे उसाच्या फडाला आग लागली. यात गणेबैल येथील चार शेतकऱ्यांचा 15 एकरमधील ऊस आगीच्या भक्षस्थानी पडला. यात नवनाथ गुरव, जोतिबा गुरव, शिवाजी गुरव यांचा प्रत्येकी 3 एकर तर अनंत पाटील यांचा 6 एकरमधील ऊस जळून खाक झाला आहे. दुपारी शेतात ठिणगी पडल्याने लागलेल्या आगीची माहिती मिळताच गणेबैल येथील शेतकऱ्यांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. कडक ऊन आणि वारा असल्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रयत्नावर मर्यादा आल्या. खानापूर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र कान्सुली येथे उसाला आग लागल्याने खानापूर येथील अग्निशमन दलाचे बंब येथे गेले होते. त्यामुळे गणेबैल येथील शेतकऱ्यांनी बेळगाव येथील अग्निशमन दलाला संपर्क साधला. बेळगाव येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे मिळून सुमारे 15 एकर ऊस पीक जळून खाक झाले आहे.

कान्सुली आणि गणेबैल येथील जळालेला ऊस लैला साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर जळीत उसाची उचल करण्यात येईल, असे आश्वासन लैला साखर कारखान्याचे अधिकारी बाळाराम शेलार यांनी शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन दिलासा दिला आहे.

रामगुरवाडी येथेही 8 एकर उसाचे नुकसान

कान्सुली येथे दुपारच्या वेळेला शॉर्टसर्किटमुळे उसाच्या फडाला आग लागली होती. याचवेळी रामगुरवाडी, गणेबैल रस्त्यालगत असलेल्या शेतातील उसात शॉर्टसर्किटमुळे ठिणगी पडल्याने आग लागली. दुपारच्या वेळी उच्च दाबाने विजपुरवठा झाल्याने ट्रान्स्फॉर्मरजवळ शार्टसर्किट झाल्याने पडलेल्या ठिणगीमुळे  नारायण घाडी, संदीप घाडी, सुधीर घाडी यांच्या उसाला आग लागली. शेजारील शेतकऱ्यांनी याबाबतची माहिती घाडी कुटुंबीयांना दिली. आग विझविण्यासाठी शेजारील शेतकऱ्यांनी प्रयत्न केले. मात्र ऊन आणि वाऱ्यामुळे त्यांना यश आले नाही. त्यामुळे संपूर्ण 8 एकर जमिनीवरील ऊस जळून खाक झाला. खानापूर तालुक्यात कान्सुली आणि गणेबैल येथे एकाचवेळी उसाला आग लागल्याने रामगुरवाडी येथील शेतातील आग विझविण्यासाठी अग्निशमक दलाचा बंब उपलब्ध होऊ शकला नाही. त्यामुळे 8 एकरमधील ऊस जळून खाक झाला आहे.

आवश्यक ठिकाणी वीजवाहिन्यांची दुरुस्ती करावी

खानापूर तालुक्यात सोमवारी एकाच वेळेला उच्च दाबाचा वीजपुरवठा झाल्याने शॉर्टसर्किटमुळे रामगुरवाडी, कान्सुली आणि गणेबैल येथे एकूण 48 एकरमधील ऊस जळून खाक झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यावर्षी पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी दुष्काळाच्या छायेखाली वावरत आहेत. अशातच ऊस जळण्याच्या घटना होत असल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. वीजपुरवठा उच्च दाबाने होत असल्याने याबाबत हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. तसेच आवश्यक ठिकाणी वीजवाहिन्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

Advertisement
Tags :

.