जि.प.चे बदली झालेले 470 शिक्षक कार्यमुक्त
रत्नागिरी :
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या बदल्यांची प्रक्रिया अखेर पूर्ण झाली आहे. प्राथमिक शिक्षकांच्या सहा संवर्गांतील एकूण 470 शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या करण्यात आल्या असून, त्यांना कार्यमुक्त करण्यात आले. हे सर्व शिक्षक सोमवारपासून त्यांच्या नवीन शाळेवर हजर होउ लागले आहेत. या बदल्यांमुळे आता बदली प्रक्रियेच्या सातव्या टप्प्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
जिल्हा परिषदेने ही बदली प्रक्रिया विविध संवर्गांनुसार राबवली. यात प्रामुख्याने संवर्ग 1 मध्ये दिव्यांग, गंभीर आजारी, अपंग, विधवा आणि 53 वर्षांवरील शिक्षकांचा समावेश होता. संवर्ग 2 मध्ये पती-पत्नी एकत्रिकरणासाठी पात्र असलेल्या शिक्षकांना संधी मिळाली, तर संवर्ग 3 मध्ये अवघड क्षेत्रातील शाळांसाठी पात्र ठरलेल्या शिक्षकांना समाविष्ट करण्यात आले. विशेष म्हणजे, 2022 मध्ये निश्चित केलेली अवघड क्षेत्रातील यादी यासाठी ग्राह्य धरण्यात आली. याशिवाय, संवर्ग 4 मध्ये एकाच शाळेत 5 वर्षे आणि अवघड क्षेत्रात 10 वर्षे काम केलेल्या शिक्षकांचा समावेश होता.
या बदली प्रक्रियेला काही शिक्षकांनी विरोध दर्शवत न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे काही काळ या प्रक्रियेला स्थगिती मिळाली होती. मात्र, ही स्थगिती उठल्यानंतर शिक्षण विभागाने तातडीने सातव्या टप्प्याची प्रक्रिया सुरू केली. या टप्प्यात, एकाच शाळेत 5 वर्षे पूर्ण न झालेल्या शिक्षकांना अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये बदली स्वीकारून जावे लागणार आहे.