For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे 46 जण अद्याप बेपत्ता

06:17 AM Aug 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे 46 जण अद्याप बेपत्ता
Advertisement

राजबनमध्ये सापडले दोन मृतदेह ; बचावकार्य सुरूच

Advertisement

वृत्तसंस्था/ शिमला

हिमाचल प्रदेशात झालेल्या ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या महापुरात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून, त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर 46 जण बेपत्ता आहेत. समेजमध्ये 36, बागीपुल आणि मंडीतील राजबनमध्ये प्रत्येकी पाच जण बेपत्ता आहेत. शुक्रवारी चौहार खोऱ्यातील राजबनमध्ये शोध मोहिमेदरम्यान आणखी दोन मृतदेह सापडले.  एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि इतर पथके बेपत्ता लोकांच्या शोधात व्यग्र आहेत.

Advertisement

एनडीआरएफ आणि एसडीआरएफने शुक्रवारी सकाळी 6.00 वाजता रामपूरच्या समेजमध्ये बचावकार्य सुरू केले. रामपूरचे एसडीएम निशांत तोमर घटनास्थळी बचावकार्यावर लक्ष ठेवून आहेत. बुधवारी रात्री कुल्लू जिल्ह्यातील नैन सरोवर, भीमद्वारी, मलाना, मंडीतील राजबन, चंबामधील राजनगर आणि लाहौलमधील जहलमा येथे ढगफुटी झाली होती. ढगफुटीमुळे 47 घरे, 10 दुकाने, 17 पूल, तीन शाळा, एक दवाखाना, एक बसस्थानक, 30 वाहने, दोन वीज प्रकल्प आणि एक धरण वाहून गेले आहे. दुसरीकडे, श्रीखंड महादेव मार्गावरील भीमद्वारीमध्ये सुमारे 250 लोक अडकले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी ढगफुटी झालेल्या भागात जाऊन नुकसानीचा आढावा घेतला. राज्याचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू शुक्रवारी दुपारी शिक्षणमंत्री रोहित ठाकूर आणि रामपूरचे आमदार नंदलाल यांच्यासह समेज येथे पोहोचले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. तसेच घटनास्थळी सुरू असलेल्या मदत व बचावकार्याची पाहणी केली. यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह एनडीआरएफचे अधिकारीही उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी एनडीआरएफ टीमकडून मदत आणि बचावकार्याची माहिती घेतली. तसेच बाधित ग्रीनको जलविद्युत प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांना घटनेची सविस्तर माहिती दिली. तसेच बाधितांची भेट घेऊन सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

Advertisement
Tags :

.