जिल्ह्यात 4525 बीएलओ कार्यरत
सर्वाधिक खानापूर तर सर्वात कमी कुडची मतदारसंघात : मतदार याद्यांचे काम अंतिम टप्प्यात
बेळगाव : जिल्हा व तालुका पंचायत निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाने लगबग चालवली आहे. मतदारयाद्या अंतिम करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून विविध वयोगटातील मतदारांची संख्या यापूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केली आहे. निवडणूक प्रक्रियेत मतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी आणि गैरप्रकार कमी करण्यासाठी, मतदार नोंदणी व मतदारयादीला अंतिम स्वरुप देण्यासाठी बीएलओ (बुथ लेव्हल ऑफिसर) यांची नियुक्ती करण्यात येते. बेळगाव जिल्ह्यात 4 हजार 525 बीएलओ कार्यरत असून सर्वाधिक खानापूर मतदारसंघात तर सर्वात कमी कुडची मतदारसंघात सेवा बजावत आहेत.
बीएलओ हे स्थानिक सरकारी/निम सरकारी अधिकारी असतात. जे स्थानिक मतदारांशी परिचित व त्याच मतदार क्षेत्रातील मतदार असतात. त्यांच्या स्थानिक ज्ञानाचा वापर करून मतदारयादी अद्ययावत करण्यात मदत होते. निवडणूक आयोगाने बीएलओ नियुक्त केल्यामुळे त्रुटीमुक्त मतदारयादी तयार होते. पूर्वी विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून मतदार ओळखपत्रे वाटण्यात येत होती. यामुळे तक्रारींना वाव मिळत असे. पण आता बीएलओंची मदत घेऊन मतदारयाद्या तयार करून ओळखपत्रे देण्यात येत आहेत.
देशाचे उज्ज्वल भविष्य असलेल्या नवमतदारांना लोकशाहीला जोडण्यासाठी बीएलओ पात्र मतदार नोंदणी करण्यास मदत करतात. बीएलओ मतदारयादीतील नोंदी जोडण्यासाठी व वगळण्यासाठी व दुरुस्ती करण्यासाठी वेगवेगळे फॉर्म प्रदान करतात. यानंतर प्रत्यक्ष पडताळणी करून निवडणूक नोंदणी अधिकारी (ईआरओ) यांच्याकडे अहवाल पाठवतात. तसेच बीएलओ स्थानिक राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून कायदेशीर प्रक्रियेनंतर मतदारयादीतून काढून टाकण्यासाठी मृत, स्थलांतरित, बोगस मतदारांची ओळख पटवतात. यानंतर पुढील प्रक्रिया करतात.
मतदारसंघ पुनर्रचना, आरक्षण यामुळे जिल्हा व तालुका पंचायतींच्या निवडणुका तब्बल चार वर्षे रखडल्या आहेत. यासाठी राज्य सरकारकडूनही निवडणुका लवकर घेण्यासाठी हालचाली सुरू असून मतदारयाद्यांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यासाठी बीएलओंची मेहनत महत्त्वाची आहे. कारण त्यांना घरोघरी जाऊन मतदार पडताळणी करून यादीला अंतिम मूर्त स्वरूप द्यावे लागते. निवडणूक कोणतीही असो बीएलओंना आपली कामे सोडून अधिकची मेहनत करावी लागते. काहीवेळा सरकारी कर्मचारी किंवा शिक्षकांना बीएलओंचे काम करावे लागते. एकीकडे मुलांचे उज्ज्वल भविष्य असते तर दुसरीकडे नवमतदारांना देशाच्या लोकशाहीला जोडावयाचे असते. मात्र शिकवणे व बीएलओंचे काम करताना शिक्षकांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागतो. यामुळे आपल्याला बीएलओ कामातून मुक्त करा, अशी मागणी शिक्षकांतून वारंवार करण्यात येते.