मांद्रे : मांद्रे येथील मधलामाज परिसरातील ४५ वर्षीय महिलेचा दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. स्पीड ब्रेकरवरून जाताना दुचाकीचा तोल गेल्याने हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शनिवारी ही महिला आपल्या पतीसोबत दुचाकीवरून मधलामाज येथून देऊळवाड्याकडे जात होती. मांद्रे येथे स्पीड ब्रेकर पार करताना दुचाकीचा तोल गेल्याने ती रस्त्यावर पडली. या अपघातात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
जखमी महिलेला सुरुवातीला तुये सार्वजनिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारांसाठी उत्तर गोवा जिल्हा रुग्णालय, म्हापसा येथे हलविण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारांसाठी तिला गोवा वैद्यकीय महाविद्यालय, बांबोळी येथे दाखल करण्यात आले.
मात्र, उपचार सुरू असतानाच बुधवारी तिचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद पोलिसांनी केली असून अपघाताबाबत पुढील तपास सुरू आहे.