निवासी शाळांतील 45 जणांना कृपांक
नेमणुकीचा आदेशही;15 वर्षांपासूनच्या लढ्याला यश
बेंगळूर : मागील अनेक वर्षांपासून कंत्राट पद्धतीने निवासी शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांनी कृपांक मिळविण्यासाठी चालविलेल्या लढ्याला अखेर यश आले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार 45 जणांना कृपांक देण्याबरोबरच नेमणुकीचा आदेश मिळाल्याने या शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. कृपांक मिळविण्यासाठी या शिक्षकांनी गेल्या 15 वर्षांपासून कायदेशिर मार्गाने लढा चालविला होता. मोरारजी देसाई, कित्तूर राणी चन्नम्मा व एकलव्य या निवासी शाळांमधून अनेक शिक्षक अनेक वर्षांपासून कंत्राट पद्धतीने काम करीत आहेत. निवासी शाळांची देखभाल करणाऱ्या कर्नाटक निवासी शिक्षण संस्थांचा संघाने (क्रेस) न्यायालयाच्या निर्देशानुसार 45 शिक्षकांना नेमणुकीचा आदेश बजावला आहे.
2004 पूर्वी निवासी शिक्षण संस्थांमध्ये दहाएक वर्षांपासून कार्य करीत असलेल्या सुमारे 3400़ जणांची एकाचवेळी नेमणूक केली होती. मात्र त्याना सेवेत कायम केलेले नव्हते. त्यानंतरच्या काळात तत्कालिन सरकारने सर्व निवासी ‘क्रेस’ च्या अखत्यारिखाली आणल्या. त्यानंतरही 2011 पासून शेकडो शिक्षक कंत्राट पध्दतीनेच काम करीत होते. क्रेसने 2011 मध्ये समूह आणि नेमणूक नियमाची अंमलबजावणी चालविली. त्यावेळी 2004 पासूनही कंत्राट पध्दतीने काम करणाऱ्यांनी आपणालाही सेवेत कायम करण्याची मागणी करीत न्यायालयाकडे धाव घेतली होती.
न्यायालयाच्या निर्देशानुसार क्रेसने वर्षातून 5 प्रमाणे किमान 5 वर्षांत 40 कृपांक देण्यास संमती दर्शविली होती. मात्र, कंत्राटी शिक्षकांनी संपूर्ण वर्षभर म्हणजे शैक्षणिक वर्षाला सुऊवात झाल्यापासून अखेरपर्यंत (जून ते एप्रिल) कार्य करण्याची अट घातली होती. त्यामुळे एक, दोन महिने उशिराने रूजू झालेल्यांना कृपांकापासून वंचित राहावे लागत होते. अशा शिक्षकांनी उच्च न्यायालयाच्या एक सदसीय पीठाकडे न्याय देण्याची मागणी केली होती.