36 कोटी अनुदानातून 45 कि.मी.ड्रेनेजलाईन कामाला चालना
आमदार असिफ सेठ यांचे विशेष प्रयत्न, नागरिकांतून समाधान
बेळगाव : उत्तर विधानसभा मतदारसंघात 36 कोटी रुपयांच्या अनुदानातून 45 कि. मी. ड्रेनेजलाईन घालण्याच्या कामाला आमदार असिफ सेठ यांनी चालना दिली. त्यानुसार नवीन ड्रेनेजलाईन घालण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी बोलताना आमदार असिफ सेठ म्हणाले, 36 कोटी रुपये अनुदानातून 45 कि. मी. ड्रेनेज लाईन घालण्याच्या कामाला चालना देण्यात आली आहे. उत्तर विधानसभा मतदारसंघातील ड्रेनेज लाईनची समस्या पूर्णपणे सोडविण्यात येईल. येत्या आठ महिन्यात हे काम पूर्ण करण्याची सूचना ठेकेदाराला केली आहे. आणखी काही समस्या असल्यास नागरिकांनी त्या आपल्या निदर्शनास आणून द्याव्यात. लवकरात लवकर काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
आमदारांच्या प्रयत्नामुळेच ड्रेनेज लाईन समस्या मार्गी
नगरसेवक बाबाजान मतवाले म्हणाले, आमदारांच्या विशेष प्रयत्नामुळेच ड्रेनेज लाईनची समस्या मार्गी लागली आहे. भविष्यात पावसामुळे उद्भवणाऱ्या समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच नागरिकांच्यावतीने त्यांनी आमदारांचे अभिनंदन केले.नगरसेविका रेश्मा भैरकदार म्हणाल्या, आपल्या मतदारसंघात नाल्यांची समस्या अधिक आहे. त्यामुळे ही समस्या मार्गी लावण्यासाठी आमदारांनी प्रयत्न करावेत. त्यावर आमदार सेठ म्हणाले, किल्ला तलावानजीक कचऱ्याच्या समस्यामुळे ओव्हरफ्लो थांबविण्यासाठी काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी 8 कोटी रुपये अनुदान मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले. नागरिक व महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.