म्यानमारला दिले 442 टन अन्नसाहाय्य
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भीषण भूकंपामुळे उध्वस्त झालेल्या म्यानमार या शेजारी देशाला भारताने मोठ्या प्रमाणात अन्नपदार्थांचे साहाय्य पाठविले आहे. हे साहाय्य एकंदर 442 टन इतके आहे. शनिवारी या साहाय्याची एक खेप त्या देशाच्या सुपूर्द करण्यात आली. आपत्तीग्रस्त म्यानमारला भारतानेच प्रथम साहाय्याचा हात दिला होता.
28 मार्चला त्या देशात प्रचंड भूकंप झाला होता. 7.7 रिष्टर क्षमतेच्या त्या भूकंपात 3 हजारांहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले होते. आधीच आर्थिक स्थिती नाजूक असलेल्या या देशाची दुर्दशा या भूकंपामुळे झाली आहे. भारताने या देशाला अन्नपदार्थ, औषधे आणि कपडे अशा प्रकारचे नित्योपयोगी साहाय्य पाठविले आहे. तसेच आणखी साहाय्याचे आश्वासनही दिले आहे. शनिवारी भारताने या देशाच्या हाती दिलेल्या साहाय्यामध्ये स्वयंपाक करण्यासाठीचे खाद्यतेल, धान्यांचे पीठ, पाच टन बिस्कीटे तर 405 टन तांदळाचा समावेश आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. पुढे आणखी साहाय्य देण्यात येणार आहे.
क्वाडचेही आश्वासन
म्यानमारला आवश्यक ते साहाय्य करण्याचे आश्वासन क्वाड या संघटनेनेही 4 एप्रिलला दिले होते. क्वाड ही संघटना अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान आणि भारत या चार देशांनी एकत्र येऊन स्थापन केली आहे. भारत-प्रशांतीय क्षेत्रात चीनच्या वाढत्या विस्तारवादाला रोखण्यासाठी ती स्थापन करण्यात आली आहे. ही संघटना दक्षिण चीन समुद्रतटावर असणाऱ्या देशांचाही आधार बनली आहे.