Satara News : साताऱ्यात 12 वर्षाच्या क्लिष्ट जटेतून 42 वर्षांच्या महिलेचे मुक्तता !
अंधश्रद्धा आणि गैरसमजामुळे महिलेला दीर्घकाळ त्रास;
सांबरवाडी : सांबरवाडी ता.सातारा येथील ४२ वर्षाच्या महिलेच्या बारावार्षापासून असणाऱ्या जटा दोन-तीन तासांच्या प्रयत्नानंतर सोडविण्यात आल्या. दुर्गम व ग्रामीण भागात असणाऱ्या महिला अंधश्रद्धा आणि गैरसमजाला आजही बळी पडलेल्या दिसतात.ही महिला दहावीपर्यंत शिकलेली आहे. डोक्यात जटा निर्माण झाल्या आणि त्या वाढल्या गेल्या पण त्यामुळे डोकेदुखी मानदुखी व मानसिक त्रास तिच्या वाट्याला आला.
सर्वात वाईट म्हणजे त्यात हजारो ऊवा व लिखा यांची झालेली वाढ.त्यामुळे सदर महिलेला रात्रीही तासभर शांत झोप मिळत नसायची. डोक्यात आग पडायची त्यात खाजवून जखमा झाल्या आहेत अशा स्थितीत जटा देव देवीच्या म्हणून राखल्या गेल्या मात्र त्रास तिला एका तपाहून अधिक काळ सोसावा लागला.
दरम्यान महिलेच्या भावाने इंटरनेटवरून जटा सोडविण्याबद्दल माहिती घेतली आणि अंनिसचे प्रशांत पोतदार व जटा निर्मुलन चळवळीचे डॉ. सुधीर कुंभार यांच्याशी संपर्क साधला.त्यांनी महिलेचे समुपदेशन करुन मानासिक तयारी करुन सातारा येथे जटा सोडवायचे निश्चित केले.जटा सोडविण्यासाठी डॉ. सुधीर कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन, सातारा येथील विक्रम खरात, कीरण लोंढे, कु. संपदा खटावकर,गौरी मोहीते यांना प्रशिक्षण दिले.जटा निर्मूलनात सौ.हर्षाली पोतदार यांनी सहकार्य केले.हरित साताराचे राजेश पुराणीक, प्रितम जाधव, प्रताप सकपाळ यांनी पूर्णवेळ सहभाग घेतला तर डॉ.वंदना जाधव ,विक्रम बांबरस यांनी जटा निर्मूलनास सहकार्य केले.महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती व एम.एम. रॉय संस्था कराड यांच्या वतीन जटामुक्तीचा हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला.
परीसरातील नागरिक ,महिला जटा निर्मूलन कसे करतात हे पाहण्यासाठी आले होते त्यांचेही प्रबोधन यावेळी करण्यात आल्याचे प्रशांत पोतदार यांनी सांगितले. जटासारख्या अशा समस्या कुटुंबातील व्यक्तींना असतील तर संपर्क करण्याचेआवाहन करण्यात आले. जटा सोडविले वर पुढे कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची केस स्वच्छ आणि चांगले कसे ठेवता येतील याबाबत माहिती देण्यात आली. केस वारंवार विंचरणे तसेच स्वच्छ धुवून काढावेत असे सांगितले.सदर महिलेच्या केसात मोठया प्रमाणावर बुरशी, लिखा, उवा होत्या तसेच डोक्यावरची त्वचा व केस रुक्ष व कोरडे होते.त्यासाठीही उपाय सांगितले. जटा सोडवल्यावर महिलेचे चेहऱ्यावर ताण रहित हास्य दिसून आले.