बस दरीत कोसळून 42 जणांचा मृत्यू
दक्षिण आफ्रिकेतील भीषण दुर्घटना
वृत्तसंस्था/ प्रिटोरिया
उत्तर दक्षिण आफ्रिकेतील एका पर्वतीय प्रदेशात बस अपघातात किमान 42 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी घडली. राजधानी प्रिटोरियापासून सुमारे 400 किलोमीटर उत्तरेस असलेल्या लुईस ट्रायकार्ड्ट शहराजवळील महामार्गावर हा अपघात झाला. बस दरीत कोसळल्यामुळे ही मोठी जीवितहानी झाल्याचे सांगण्यात आले. रोड ट्रॅफिक मॅनेजमेंट कॉर्पोरेशनचे प्रवत्ते सायमन झ्वेन यांनी 42 जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. मृतांचा आकडा वाढू शकतो असे सांगतानाच बस एका उंच डोंगराळ खिंडीजवळ रस्त्यावरून घसरून दरीत पडल्याने हा अपघात झाल्याचेही स्पष्ट केले. अपघातग्रस्त बस दक्षिण आफ्रिकेच्या पूर्व केपहून देशाच्या दक्षिणेकडे जात होती. मृतांमध्ये झिम्बाब्वे आणि मलावीचे नागरिक असल्याचेही सांगितले जात आहे. दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामाफोसा यांनी बस अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे.