गहाळ झालेले 42 मोबाईल फोन मूळ मालकांना परत
सातारा :
शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून नागरिकांचे गहाळ झालेले एकूण 10 लाख 50 हजार रुपये किमतीचे 42 मोबाईल शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून मूळ मालकांना परत केले आहेत. सी. ई. आय. आर पोर्टल व इतर तांत्रिक माहितीच्या आधारे हे मोबाईल फोन शोधण्यास यश आले आहे.
गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सी. ई. आय. आर पोर्टल व इतर तांत्रिक माहिती प्राप्त करुन महाराष्ट्रातील व इतर राज्यातील मोबाईल मिळालेल्या लोकांशी नियमित संपर्क करुन चिकाटीने ही मोहीम राबवली. त्यांना साडेदहा लाखांचे 42 मोबाईल हस्तगत करण्यात यश आलेले आहे. ही मोहीम पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. यापुढे अशीच शोध माहीम सातत्याने राबवण्यात येणार असल्याचे शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी सांगितले आहे. तरी आजपर्यंत गहाळ झालेल्या मोबाईलपैकी 80 मोबाईल नागरिकांना परत देण्यात शाहूपुरी पोलिसांना यश आले आहे.