भारतीय कोळसा उत्पादनात 42 टक्क्यांची वाढ
ऑक्टोबरमधील आकडेवारी सादर : पुरवठ्यात 36 टक्क्यांची वाढ
त. भा. वृत्तसंस्था
दिल्ली : देशातील खासगी आणि व्यावसायिक खाणींमधील कोळसा उत्पादन ऑक्टोबर 2026 मध्ये 42 टक्क्यांनी वाढून 2.20 कोटी टन झाले. पुरवठ्यातही 36 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे कोळसा आयातीवरील अवलंबित्व कमी होण्याची अपेक्षा आहे. खासगी आणि व्यावसायिक खाणींमधील कोळसा उत्पादन ऑक्टोबर 2026 मध्ये वार्षिक 42 टक्क्यांनी वाढून 2.203 दशलक्ष टन झाले. गेल्या वर्षी याच महिन्यात हे उत्पादन 1.549 कोटी टन होते. कोळसा मंत्रालयाने सोमवारी ही माहिती दिली आहे.
या खाणींमधून कोळशाचा पुरवठा या महिन्यात 36 टक्क्यांनी वाढून 2.111 कोटी टन झाला, जो ऑक्टोबर 2025 मध्ये 1.548 कोटी टन होता. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-ऑक्टोबर दरम्यान खासगी आणि व्यावसायिक खाणींमधील कोळशाचे उत्पादन 11.3 टक्क्यांनी वाढून 11.723 कोटी टन झाले, जे गेल्या वर्षी याच कालावधीत 10.533 कोटी टन होते.
सात महिन्यांच्या कालावधीत पुरवठा 11.53 टक्क्यांनी वाढून 12.486 कोटी टन झाला, जो एका वर्षापूर्वी 11.195 कोटी टन होता. आणखी एका घडामोडीत, झारखंडच्या लोहारी कोळसा खाणीला कामकाज सुरू करण्यासाठी अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ऑक्टोबर 2026 मध्ये खाण उघडण्याची परवानगी मिळाली.
यामुळे खासगी वापरासाठीच्या सक्रिय कोळसा खाणी आणि व्यावसायिक कोळसा खाणींची संख्या 87 झाली आहे, असे मंत्रालयाने सांगितले. मंत्रालयाच्या मते, खासगी आणि व्यावसायिक खाणींमधील वाढलेल्या उत्पादनामुळे आयात केलेल्या कोळशावरील अवलंबित्व कमी होण्याची, पुरवठा साखळी मजबूत होण्याची आणि परकीय चलन वाचण्याची अपेक्षा आहे. तसेच, यामुळे कोळशाच्याबाबतीत आत्मनिर्भरता वाढेल.
