सिव्हिलमध्ये तीन महिन्यात 41 शिशूंचा मृत्यू
ऑक्सिजनच्या कमतरतेचा आरोप बिम्सने फेटाळला
प्रतिनिधी/ बेळगाव
ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रसूती विभागात गेल्या तीन महिन्यात 41 नवजात शिशुंचा मृत्यू झाला आहे. बिम्स प्रशासनाने मात्र ऑक्सिजनची कमतरता नसून वेगवेगळ्या कारणांनी नवजात शिशुंचा मृत्यू झाल्याचा खुलासा केला आहे.
गेल्या ऑगस्टपासून 24 ऑक्टोबरपर्यंत एकूण 41 नवजात शिशू दगावले आहेत. ऑगस्टमध्ये 12, सप्टेंबरमध्ये 18 व 24 ऑक्टोबरपर्यंत 11 अशा एकूण 41 शिशूंचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजन पुरवण्यासाठीचा एअर कॉम्प्रेसर नादुरुस्त झाल्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप करण्यात येत असून बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. अशोक शेट्टी यांनी या आरोपांचा इन्कार केला आहे.
कोरोनाच्या काळात स्वतंत्र ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात आले आहेत. तेव्हापासून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आयसीयु विभागात दाखल होणाऱ्या व इतर विभागातील रुग्णांना गरजेनुसार ऑक्सिजन पुरवठा सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून एअर कॉम्प्रेसर नादुरुस्त झाल्यामुळे ऑक्सिजन पुरवठ्यात व्यत्यय निर्माण झाला आहे.
कॉम्प्रेसर दुरुस्तीसाठी बिम्सने निविदा मागवली होती. मिरज व बेळगाव येथील दोन कंपन्यांनी कोटेशन दिले होते. ही प्रक्रिया सुरू असतानाच नवजात शिशू विभागात ऑक्सिजनअभावी शिशूंचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. अशोक शेट्टी यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.
ऑक्सिजन पुरवठ्यासाठी दोन कॉम्प्रेसर आहेत. एक कॉम्प्रेसर सुरू असतो. पर्याय म्हणून दुसरा कॉम्प्रेसर तयार ठेवण्यात येतो. पर्यायी कॉम्प्रेसर नादुरुस्त झाला असला तरी ऑक्सिजन पुरवठ्यात व्यत्यय आला नाही. नवजात शिशूंचा मृत्यू व्यवस्थित वाढ न झाल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे झाल्याचे त्यांनी सांगितले.