हलगा येथील पान शॉप फोडून 40 हजाराचा माल लंपास
बेळगाव : हलगा येथील एका ढाब्यासमोरील पान शॉपचे कुलूप फोडून सुमारे 40 हजार रुपयांचा ऐवज लांबविण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला आहे. हिरेबागेवाडी पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. हलगा येथील कुबेर पान शॉपचे कुलूप फोडून सिगारेट पाकिटांचे बॉक्स, गल्ल्यातील तीन हजार रुपये रोख रक्कम, साबण, चॉकलेट, बिस्किटे, तंबाखू, ग्लास आदी सुमारे 40 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळविला आहे. यासंबंधी पान शॉपचे मालक महेश कऱ्याप्पा हट्टीहोळी यांनी हिरेबागेवाडी पोलिसांना माहिती दिली आहे. चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा तोडून त्याच्या वायरही कापल्या आहेत. आपली छबी कॅमेऱ्यात कैद होऊ नये, याची त्यांनी दक्षता घेतली आहे. याच परिसरातील एका गॅरेजमधून वाहनांच्या बॅटऱ्या चोरण्यात आल्या होत्या. या घटनेला दोन दिवस उलटले नाहीत, तेच पान शॉपमध्ये चोरी झाली आहे. हिरेबागेवाडीचे काही पोलीस महामार्गावर वेगळ्या कारणासाठी तळ ठोकून असतात. मात्र, सगळीकडे गस्त घालताना दिसत नाहीत. वाढत्या चोऱ्या थोपविण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी केली जात आहे.