अनगोळ औद्योगिक वसाहतीत कारखाना फोडून 40 हजाराची चोरी
पोलिसांनी गस्त वाढविण्याची उद्योजकांची मागणी
बेळगाव : उद्यमबाग परिसरातील कारखान्यात चोऱ्या सुरूच आहेत. अनगोळ औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्याचा दरवाजा फोडून 40 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी पळविला आहे. रविवारी ही घटना उघडकीस आली असून उद्यमबाग पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. वायसीपी इंडस्ट्रीज हा कारखाना फोडून मोटर पंप, सबमर्सिबल पंप, वॉटर कोल्ड लिड, वायर बंडल, केबल वायर असे एकूण 39 हजार 500 रुपये किमतीचे साहित्य चोरट्यांनी पळविले आहे. रविवार दि. 17 नोव्हेंबर रोजी दुपारी चोरीची ही घटना उघडकीस आली असून व्यवस्थापकांनी दिलेल्या फिर्यादीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. उद्यमबागचे पोलीस निरीक्षक डी. के. पाटील पुढील तपास करीत आहेत. उद्यमबाग औद्योगिक वसाहतीत चोऱ्या वाढल्या आहेत. कारखाना फोडून साहित्य पळविण्याच्या घटना घडत आहेत. पोलिसांनी या परिसरात गस्त वाढविण्याची मागणी केली जात आहे.