स्मार्ट सिटी' रत्नागिरीसाठी ४०० कोटी मंजूर! पालकमंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषदेत माहिती
शहरासह ग्रामीण भागाचाही होणार कायापालट
रत्नागिरी प्रतिनिधी
राज्यातील तळोजा शहर एमआयडीसीने दत्तक घेत जसा स्मार्टसिटी म्हणून विकास केला. त्याप्रमाणे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी शैक्षणिक हब नंतर ‘स्मार्ट सिटी' रत्नागिरीसाठी लक्ष केंद्रीत केले आहे. ‘रत्नागिरी स्मार्ट सिटी'साठी एमआयडीसीकडून ४०० कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती सामंत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे रत्नागिरी शहरासह ग्रामीण भागाचा कायापालट होण्यास मदत होणार आहे.
मंत्री सामंत यांनी गुरुवारी प्रशासनासोबत विविध कामांची आढावा बैठक घेतली. यामध्ये रत्नागिरी शहर स्मार्ट सिटी व्हावी, यासाठी एमआयडीसीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. याबाबतची मंजूर झालेल्या ४०० कोटीची निविदादेखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या कामांचे भूमिपूजन पुढील महिन्याच्या ५ किंवा ६ तारखेला होणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. रत्नागिरी शहरातील सर्व शाळा, सर्व रस्ते, सांडपाण्याची व्यवस्था, तोरण नाला या सर्व बाबी या कामांच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील एमआयडीसीला लागून असणाऱ्या शाळा, पाखाड्या यांचादेखील यात समावेश करण्यात आला आहे. रत्नागिरीत स्टरलाईट, वाटद, रीळ-उंडी, राजापूर आदी ठिकाणी औद्योगिक क्षेत्र जाहीर झाले आहे. ज्या शहरालगत मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र आहे, त्या शहराचा विकास एमआयडीसीमार्फत होतो. त्या अनुषंगाने रत्नागिरी शहराचा स्मार्ट सिटी म्हणून विकास केला जाणार आहे. यामध्ये शाळा, रस्ते, ड्रेनेज सिस्टीम यादीचा समावेश आहे. या कामांमुळे रत्नागिरी शहराचा चेरामोहरा बदलणार आहे, असे सामंत यांनी सांगितले.