एसटीच्या गौरी-गणपती उत्सवासाठी 400 बस ! कोकणासाठी आजपासून 200 जादा बस
कोल्हापूर प्रतिनिधी
राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) गौरी-गणपती उत्सवानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी 400 बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये नियोजित फेऱ्या व्यतरिक्त 200 बस केवळ कोकणात सोडण्यात येणार आहे.
पुणे, मुंबई, रत्नागिरी, सावंतवाडी, मालवण, कणकवली, सांगली, इस्लामपूर, बेळगांव या मार्गावर गौरी-गणपतीच्या सणानिमित्ताने गावी येणाऱ्या भाविक प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीच्या कोल्हापूर विभागामार्फत वाहतूकीचे नियोजन करण्यात आले आहे. प्रवाशी उपलब्धतेनुसार जादा फेऱ्या सोडण्यात येणार आहेत.
यामध्ये मुंबई व ठाणे विभागातून कोकणासाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी सुमारे 240 बसेस सोडण्यात येणार आहेत. तसेच पुणे (स्वारगेट, पिपंरी-चिचंवड, निगडी, हिंजवडी) येथून कोल्हापूर जिल्हयात येणाऱ्या प्रवाशांसाठी आज बुधवारपासून शुक्रवार (दि.6) या कालावधीत नियोजित फेऱ्या व्यतिरीक्त जादा 200 बसेस सोडणेत येणार आहेत. प्रवाशांनी रा.प. महामंडळाच्या स्थानकावरील रा.प. च्याआरक्षण केंद्राद्वारे, वेब पोर्टलव्दारे व मोबाईल अॅप सुविधेव्दारे तिकीटे आगाऊ आरक्षित करुन ऐनवेळी होणारी गैरसोय टाळावी.
गणेशउत्सवामध्ये विभागांतर्गत प्रवाशांमध्ये वाढ होत असल्याने कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक, रंकाळा बसस्थानक, इचलकरंजी बसस्थानक या महत्त्वाच्या बसस्थानकावरुन इस्लामपूर, सांगली, मिरज, निपाणी, बेळगांव, गडहिंग्लज, गारगोटी, आजरा, चंदगड या मार्गावर प्रवासी उपलब्धतेनुसार जादा वाहतूकीचे नियोजन करण्यात आले आहे. तरी, प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा.
शिवराज जाधव, विभाग नियंत्रक, कोल्हापूर