महामार्गावर चिपळूण टप्प्यातील 40 टक्के झाडे मृत
चिपळूण :
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण टप्प्यातील परशुराम ते खेरशेत या 34 कि.मी. टप्प्यात गतवर्षी करण्यात आलेल्या वृक्षलागवडीतील वास्तव आता समोर आले आहे. सोमवारी कंत्राटदार कंपनी ईगलचे अधिकारी आणि पर्यावरणप्रेमींनी केलेल्या पाहणीत लागवडीतील अवघी 40 टक्केच झाडे जगली असल्याचे दिसून आले. येत्या 15 जुलैपर्यंत मृत झालेल्या वृक्षांच्या ठिकाणी नवीन वृक्ष लागवड पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.
महामार्गावरील चिपळूण टप्प्यात शहरातील 1840 मीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे काम सोडले तर या टप्प्यातील चौपदरीकरणाचा प्रवास सुस्साट झाला आहे. मात्र गेल्या दोन-तीन वर्षांपासून महामार्ग चौपदरीकरण पूर्ण झालेल्या ठिकाणच्या वृक्षलागवडीचा विषय गाजत आहे. त्यासाठी येथील पर्यावरणप्रेमींनी आंदोलनात्मक पाऊल उचलल्यानंतर महामार्ग कंत्राटदार कंपनीकडून वृक्ष लागवड हाती घेण्यात आली. मात्र उन्हाळ्यात त्याची पुरेशी देखभाल न केली गेल्याने झाडे जगण्याचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे यावर्षी महामार्गावरील वृक्षलागवडीची नेमकी स्थिती पाहण्यासाठी येथील पर्यावरण प्रेमी, जलदूत शाहनवाज शाह, समीर कोवळे यांनी ईगल चेतक कंपनीचे अधिकारी शहाबुद्दीन यांच्यासोबत महामार्गाची पाहणी केली.
- 15 जुलैपर्यंत नव्याने वृक्षलागवड पूर्ण करणार!
यामध्ये रस्त्यालगत व मध्य भागातील वृक्ष लागवडची पाहणी करत असताना गेल्या वर्षी लावलेल्या झाडांपैकी 40 टक्केच झाडे जगलेली आढळली. तर 20 टक्के झाडांची मुळे जिवंत आहेत व 40 टक्के झाडे मृत आहेत. या झाडांच्या लागवडीबरोबरच या भागात वाढलेले गवत तातडीने काढणे गरजेचे असल्याचे शाह यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. यावर शहाबुद्दीन यांनी परशुराम घाटापासून लागवडीला सुरुवात केली असून येत्या 15 जुलैपर्यंत वृक्षलागवडीसह इतर कामे पूर्ण केली जातील, असे आश्वासन दिले.