40 आमदारांना प्रत्येकी 20 कोटींची ऑफर!
आम आदमी पक्षाचा दावा : केजरीवाल यांनी आमदारांची घेतली बैठक
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आपच्या दिल्लीतील 40 आमदारांना भाजपने पक्ष बदलण्यासाठी प्रत्येकी 20 कोटी रुपयांची ऑफर देऊन लक्ष्य केल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी केला. आपल्या सर्व 62 आमदारांना ‘ऑपरेशन लोटस’पासून सतर्क करण्यासाठी केजरीवाल यांनी बैठक आयोजित केली होती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. तासाभरात संपलेल्या या बैठकीला केजरीवाल यांच्यासह पक्षाचे 53 आमदार प्रत्यक्ष उपस्थित होते, असे आम आदमी पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी सांगितले.
दिल्लीत ‘ऑपरेशन लोटस’च्या मुद्यावरून गुरुवारीही राजकीय गदारोळ सुरूच होता. गुरुवारी केजरीवाल यांच्या निवासस्थानी आम आदमी पक्षाच्या आमदारांची बैठक पार पडली. बैठकीनंतर केजरीवाल राजघाटावर जात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर भाजप आमच्या 40 आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे. सर्व आमदारांना 20-20 कोटींची ऑफर दिली जात आहे. भाजपला 800 कोटी खर्च करून दिल्ली सरकार पाडायचे आहे, असा दावा त्यांनी यावेळी केला.
सर्व आमदार पक्षासोबतच : आप
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बोलविलेल्या बैठकीत आठ-नऊ आमदार अनुपस्थित असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, बैठकीला सर्व आमदार उपस्थित असल्याचे बैठकीअंती स्पष्ट झाले. काही आमदार दिल्लीच्या बाहेर असल्यामुळे ते ‘व्हर्च्युअल’ प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाल्याचे सांगण्यात आले. मनीष सिसोदिया हिमाचल दौऱयावर तर, राम निवास गोयल अमेरिकेत असल्यामुळे त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली. महाराष्ट्राप्रमाणेच दिल्लीतील आमदारांनाही भाजप खरेदी करेल अशी भिती आपला वाटत आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाने पॉलिटीकल अफेअर्स कमिटीच्या बैठकीत सर्व आमदारांच्या बैठकीचे नियोजन केले होते.
दिल्लीत दारू नीती घोटाळय़ावरून वाद सुरू आहे. आम आदमी पक्षाच्या आमदारांना विकत घेण्याचा भाजपचा डाव फसल्याने भाजपच्या ऑपरेशन लोटसचा पर्दाफाश झाला होता. आपच्या काही आमदारांनी काल पत्रकार परिषद घेऊन त्यांना भाजपने 20 कोटींची ऑफर देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे आपचे आमदार भाजपच्या गळाला लागू नयेत आणि भाजपविरोधात रणनीती आखण्यासाठी बैठक घेतली.
भाजपचा पुन्हा ‘आप’वर निशाणा
याप्रकरणी केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी आम आदमी पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. आम्हाला तुमचे सरकार तोडण्याची गरज नाही. तुरुंगात बंद असलेले मंत्री सत्येंद्र जैन यांना आजपर्यंत का हटवले नाही हे केजरीवाल यांनी सांगावे, असे त्या म्हणाल्या.
सिसोदिया यांच्या पुतळय़ाचे दहन
दारू धोरणातील भ्रष्टाचारावरून मनीष सिसोदिया यांच्याविरोधात भाजपने दिल्लीत निदर्शने केली. प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या नेत्यांनी मनीष सिसोदिया यांच्या पुतळय़ाचेही दहन केले. याप्रसंगी ‘गली-गली में शोर है, सिसोदिया चोर है’ असे पोस्टरही लावण्यात आले होते.