काशी-अयोध्येत 40 लाख भाविक
अयोध्येत हाय अलर्ट; गर्दीमुळे रॅपिड अॅक्शन फोर्स तैनात
वृत्तसंस्था/ अयोध्या
मौनी अमावस्येला 40 लाख भाविक वाराणसी आणि अयोध्येत पोहोचले आहेत. बुधवारी दुपारपर्यंत सुमारे 30 लाख लोक काशीत पोहोचले होते. गंगा स्नानासाठी अस्सी घाट, तुळशी घाट, केदार घाट, दशाश्वमेध, राज घाट येथे भाविकांनी केलेल्या गर्दीमुळे घाटांवर बॅरिकेडिंग करण्यात आले. गर्दीमुळे अयोध्येत हाय अलर्ट जारी करण्यात आला असून रॅपिड अॅक्शन फोर्स तैनात केले आहे.
मौनी अमावस्येनिमित्त काशीतील घाटापासून राममंदिरापर्यंत भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. लाखो लोक घाटांवर गंगेत पवित्र स्नान करून मोक्ष मिळवत होते. तसेच शहरातील मंदिर परिसर पर्यटकांनी गजबजलेला होता. 3 किलोमीटर लांब रांगेत लोक बाबा विश्वनाथांचे दर्शन घेण्यासाठी प्रतीक्षा करत असल्याचे दिसून आले. पर्यटकांच्या वाढत्या संख्येच्या सुरक्षिततेचा विचार करून शहरात रस्ते वळवण्याची व्यवस्था करण्यात आली. मोठ्या संख्येने दाखल झालेल्या पोलीस आणि आरएएफ दलाने सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी घेतली आहे.
भगवान रामलल्लाच्या मंदिरात दर्शनासाठी लांब रांग आहे. गर्दीने मागील सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. गर्दी लक्षात घेता, प्रशासन आणि सुरक्षा अधिकाऱ्यांवरील ताण वाढला आहे. राज्य पोलिसांसह यासोबतच इतर सुरक्षा यंत्रणांना तैनात करण्यात आले आहे. एसएफएफ, पीएसी, सीआरपीएफ आणि आरएएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. सर्वजण मिळून पर्यटकांना दर्शन घेणे सोपे करत आहेत. एवढेच नाही तर मेळा परिसरात एटीएस आणि पीएसी कमांडो देखील तैनात करण्यात आले आहेत.