शहरात 40 किलोमीटर जलवाहिनीचे काम पूर्ण
24 तास पाणीपुरवठ्यासाठी खोदाई : 16 हजार घरांना नळजोडणी : 14 ठिकाणी जलकुंभ
बेळगाव : शहराला 24 तास पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट एलअँडटी कंपनीने ठेवले आहे. यासाठी 95 किलोमीटर जलवाहिनी घातली जात आहे. आतापर्यंत 40 किलो मीटरपर्यंत जलवाहिनी घालण्याचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. शिवाय 16 हजार घरांना नळजोडणीचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे 2026 पर्यंत शहराला 24 तास पाणीपुरवठा शक्य आहे. शहराला 24 तास पाणीपुरवठा व्हावा, यासाठी जलवाहिनी घातली जात आहे. मंगळवारपासून वर्दळीचे ठिकाण असलेल्या काकतीवेस रोडवर जलवाहिनीसाठी खोदाईचे काम हाती घेण्यात आले आहे. चन्नम्मानगर आणि इतर ठिकाणी 24 तास पाणीपुरवठ्यासाठी जलवाहिनीचे काम करण्यात आले आहे.
या ठिकाणी प्रायोगिकतत्त्वावर 24 तास पाण्याचा पुरवठाही केला जात आहे. शहरातील 58 प्रभागमध्ये 24 तास पाणीपुरवठा केला जाणार आहे. मात्र जलवाहिनी घालण्याचे काम संथगतीने सुरू असल्याने 2026 पर्यंत 24 तास पाणीपुरवठा होण्याबाबत शंका व्यक्त होऊ लागली आहे. शहराला 24 तास पाणीपुरवठा व्हावा, यासाठी 14 ठिकाणी जलकुंभ उभारण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. मात्र काही ठिकाणी या जलकुंभाचे कामही रेंगाळल्याचे दिसत आहे. नुकत्याच झालेल्या मनपा बैठकीत एलअँडटीचे मॅनेजर धीरज उभ्यंकर यांनी 24 तास पाणीपुरवठ्याबाबत माहिती दिली होती. शिवाय 2026 पर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र सद्य:स्थितीत कामाची गती पाहता 2026 पर्यंत 24 तास पाणीपुरवठा होणे अशक्य असल्याचे बोलले जात आहे.
खोदाईमुळे काँक्रीटच्या रस्त्यांची दुर्दशा
शहरात खोदण्यात येत असलेल्या 24 तास पाणीपुरवठ्यामुळे रस्त्याची वाट लागत आहे. विशेषत: काँक्रीटचे रस्ते खराब होऊ लागले आहेत त्यामुळे प्रशासनाच्या निधीचा चुराडा होऊ लागला आहे. एकीकडे स्मार्ट सिटी अंतर्गत काँक्रीटचे रस्ते तयार झाले आहेत. तर दुसरीकडे जलवाहिनी घालण्यासाठी याच रस्त्यावर खोदाई केली जात आहे. त्यामुळे काँक्रीटच्या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे.