For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बायोगॅससाठी अजूनही 4 टन कचरा आवश्यक

11:02 AM Mar 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
बायोगॅससाठी अजूनही 4 टन कचरा आवश्यक
Advertisement

व्यावसायिकांनी-जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन

Advertisement

बेळगाव : महानगरपालिकेने एपीएमसी येथे बायोगॅस प्रकल्प उभारला आहे. यासाठी तब्बल 1 कोटी 28 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस तयार केले जाते. त्यामधून एपीएमसीला विद्युत पुरवठा करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सुरुवातीला 200 किलो ओला कचरा शहरातून मिळत होता. मात्र, आता तो 1 टनपर्यंत पोहोचला असून अजूनही 4 टन कचऱ्याची आवश्यकता आहे. तेव्हा भाजी विक्रेते तसेच होलसेल भाजी मार्केटवाल्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त पी. एन. लोकेश यांनी केले आहे. बेळगावच्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला येत असतो. बऱ्याच वेळा भाजीपाला विक्री होत नसल्याने रस्त्यावरच फेकून दिला जातो. मात्र, या भाजीपाल्यामुळे बायोगॅस निर्माण होते. एपीएमसी प्रकल्प उभारल्यानंतर त्या ठिकाणी बायोगॅस उत्पादनाला सुरुवात झाली आहे. सध्या केवळ यंत्रसामग्री सुरू होईल इतकेच बायोगॅस उत्पादित होत आहे. अजून मोठ्या प्रमाणात ओला कचरा जमा केल्यानंतरच एपीएमसीला वीजपुरवठा देणे शक्य आहे. त्यासाठी साऱ्यांनीच सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे.

कंपोस्ट खतही तयार

Advertisement

सध्या हा प्रकल्प प्रगतिपथावर आहे. गॅसचे उत्पादन काही प्रमाणात होत आहे. याचबरोबर कंपोस्ट खतदेखील तयार होत आहे. आतापर्यंत दोन ट्रक खत उत्पादन झाले आहे. त्याचा उपयोग शहरातील विविध उद्यानांमधील वृक्षांना करण्यात आल्याची माहिती पर्यावरण विभागाचे साहाय्यक अभियंते हणमंत कलादगी आणि आदिलखान पठाण यांनी दिली. प्रकल्प उभारण्यात आल्यानंतर तो पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी ओल्या कचऱ्याची गरज मोठ्या प्रमाणात भासत आहे. सध्या या प्रकल्पासाठी दररोज एक टन कचरा जमा होत आहे. मात्र, अजूनही कचऱ्याची गरज असून व्यावसायिकांनी स्वतंत्रपणे ओला कचरा दिल्यास त्याचा फायदा होणार आहे.

Advertisement
Tags :

.