जमिनीखाली आढळला 4 हजार वर्षे जुना महाल
200 फूट लांब, 100 फूट रुंद
एका प्राचीन शहरात पुरातत्व तज्ञांना मिळालेल्या गोष्टी थक्क करून सोडणाऱ्या आहेत. येथे 4 हजार वर्षे जुना महाल सापडला आहे. मध्य चीनच्या हेनान प्रांतातील शिनमीच्या पुरातत्वस्थळावर तज्ञांनी हा मोठा शोध लावला आहे. यापूर्वीही एक अन्य प्राचीन चिनी शहर एका सरोवराच्या तळाशी पूर्णपणे संरक्षित आढळून आले होते. शिनमी शहरात आढळून आलेली संरचना ही एक प्राचीन शहर म्हणून ओळखली जात होती. याची निर्मिती जिया राजवंशादरम्यान ख्रिस्तपूर्व 2070-1600 दरम्यान करण्यात आली होती. तर जिया हा इतिहासातील पहिला चिनी राजवंश असल्याचे मानले जाते. शिनमी शहर अनेक वर्षांपूर्वी शोधण्यात आले होते. झेंशुई नदीच्या पूर्व काठावर हे शहर असून जवळपास 17 हेक्टर क्षेत्रात फैलावलेले आहे.
या शहराचे विश्लेषण अद्याप सुरू असून याचदरम्यान आता 4 हजार वर्षे जुन्या महालाचे अवशेष मिळाले आहेत. यात महालाच्या पायासमवेत अनेक गोष्टींचा शोध लागला आहे. यामुळे महाल कशाप्रकारचा होता याचा अनुमान सहजपणे लावता येतो. ही संरचना प्राचीन निर्मिती तंत्रज्ञानांचा वापर करून तयार करण्यात आली होती, ज्यात चुना, चाक आणि माती यासारख्या कच्च्या सामग्रीचा वापर केला जातो. हा महाल 200 फूट लांब, 100 फूट रुंद आणि 19 हजार चौरस फुटांपेक्षा अधिक क्षेत्रात फैलावलेला आहे. पुरातत्व तज्ञांना येथे मोठी छिद्रं देखील आढळून आली आहेत. महालाच्या परिसराशी संबंधित हा पाया राहिला असावा, ज्यात दक्षिण आणि उत्तरेस छत, पूर्व आणि पश्चिमेस मठ आणि केंद्रस्थानी एक यार्ड होते असे तज्ञांच्या पथकाचे प्रमुख ली बो यांनी म्हटले आहे.