पेरूमध्ये मिळाले 4 हजार वर्षे जुने मंदिर
मंदिरात दिला जात होता मानवी बळी
पुरातत्व तज्ञांच्या एका पथकाने उत्तर पेरूमध्ये 4 हजार वर्षे जुन्या मंदिराचा शोध लावला आहे. पुरातत्वतज्ञांना मंदिराच्या अवशेषांसोबत मानवी सांगाड्याचे अवशेषही मिळाले. धार्मिक विधीसाठी बळीच्या स्वरुपात मानवांचा वापर करण्यात आला असावा असा अनुमान व्यक्त करण्यात आला. हे अवशेष पेरूमधील लाम्बायेक क्षेत्रातील वाळवंटी भागात शोधण्यात आले आहेत. हे क्षेत्र प्रशांत महासागरापासून काही अंतरावरच आहे. राजधानी लीमापासून या भागाचे अंतर 780 किलोमीटर इतके आहे. हे मंदिर 4 हजार वर्षे जुने असू शकते असे पुरातत्व तज्ञांच्या पथकाचे नेतृत्व करणारे पेरूचे पोंटिफिकल कॅथोलिक विद्यापीठाचे पुरातत्व तज्ञ लुइस मुरो यांनी सांगितले आहे.
तारखेच्या पुष्टीसाठी रेडिओ कार्बन डेटिंगची आम्ही प्रतीक्षा करत आहोत. परंतु धार्मिक विधीदरम्यान पेरूच्या उत्तर किनाऱ्यावर असलेल्या या मंदिरात मानवी बळी दिला जात असल्याचे पुरावे मिळाले आहेत. अवशेष पाहता ही एक बहुमजली संरचना होती, असे समजते. येथील भिंती आणि आधारांदरम्यान तीन प्रौढांचे सांगाडे सापडले आहेत, असे मुरो यांनी सागितले. मंदिराच्या भिंतीवर माइथोलॉजिकल आकृतीचे एक चित्र असून त्यात मानवी शरीरावर पक्ष्याचे शीर आहे. चित्राचे हे डिझाइन पूर्व हिस्पॅनिक चॅविन संस्कृतीपूर्वीचे आहे, संबंधित संस्कृती जवळपास ख्रिस्तपूर्व 900 सालापासून मध्य पेरूच्या किनाऱ्यावर हजार वर्षापर्यंत वसलेली होती, असे संशोधकांनी सांगितले. या अवशेषांनजीक अन्य उत्खननात आणखी एका मंदिराचे अवशेष मिळाले असून ते मोचे संस्कृतीशी संबंधित आहेत. ही संस्कृती 1400 वर्षांपूर्वी देशाच्या उत्तर किनाऱ्यावर विकसित झाली होती. उत्तर पेरूमध्ये जवळपास 5 हजार वर्षे जुन्या कॅरलच्या पवित्र शहराचे अवशेष आहेत. पेरूचे सर्वात प्रमुख पुरातत्व स्थळ माचू-पिच्चू असून ते इंका संस्कृतीचे केंद्र होते. पर्वतीय कुस्को प्रांतातील हे ठिकाण जागतिक वारसास्थळांमध्ये सामील आहे. हे 15 व्या शतकातील मध्यात विकसित झाले होते.