प्रेयसीसह 4 जणांची माथेफिरूकडून हत्या
हातोडा-चाकूने केले वार : विषप्राशनानंतर पोलिसांसमोर आत्मसमर्पण
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
केरळच्या तिरुअनंतपुरम येथील वेंजारामुडू येथे सोमवारी रात्री 23 वर्षीय युवकाने 5 जणांची हत्या केली. आरोपीने प्रेयसी, भाऊ, आजी, काका आणि काकूची चाकू-हातोड्याने निर्दयपणे वार करत हत्या केली. यानंतर आरोपीने आईवर हल्ला करत तिचाही जीव घेण्याचा प्रयत्न केला. युवकाने पूर्ण प्लॅनिंगसह तीन वेगवेगळ्या ठिकाणी हे कृत्य केले. हत्येनंतर त्याने वेंजारामुडू पोलीस स्थानकात जात आत्मसमर्पण पेले आणि गुन्ह्याची कबुली दिली. स्वत:ची आई, प्रेयसी समवेत 6 जणांची हत्या केल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले होते. आरोपीचे नाव अफ्फान आहे.
पोलिसांनी आतापर्यंत 5 जणांच्या मृत्यूची पुष्टी दिली आहे. यात आरोपीचा भाऊ अहसन, आजी सलमा बीवी, काका लतीफ, काकू शाहिदा आणि त्याची प्रेयसी फरशाना सामील आहे. आरोपीच्या विरोधात 2 पोलीस स्थानकांमध्ये 3 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
कर्जात बुडाला होता आरोपी
संबंधित युवक कर्जात बुडाला होता. तर परिवाराने हे कर्ज फेडण्यासाठी मदत करण्यास नकार दिला होता. याचमुळे या सर्वांची हत्या केल्याचे मानले जात आहे. आखातात मी व्यवसाय करत होतो, परंतु तेथे मला प्रचंड नुकसान झाले. यामुळे मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले होते. पण परिवाराने कुठलीच मदत केली नाही. यामुळे या सर्वांची हत्या केल्याने त्याने पोलिसांना सांगितले आहे. परंतु पोलिसांना आरोपीच्या या दाव्याबद्दल संशय आहे. आता पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. अफ्फानच्या मोबाइल फोन अन् कॉल डिटेल्सची तपासणी केली जात आहे.
आईची प्रकृती गंभीर
आरोपी अफ्फानने स्वत:ची आई शेमी (47 वर्षे) वरही हल्ला केला. शेमी या कॅन्सरच्या रुग्ण आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असून तिरुअनंतपुरम येथील रुग्णालयात आयसीयूत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर अफ्फानने विषप्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, यामुळे त्यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.