For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीयांना युद्धात लोटल्याप्रकरणी 4 जणांना अटक

06:38 AM May 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतीयांना युद्धात लोटल्याप्रकरणी 4 जणांना अटक
Advertisement

रशिया-युक्रेन युद्ध : 1 लाख रुपयांच्या वेतनाचे दाखविले आमिष : 180 भारतीयांना परत आणण्याचा प्रयत्न

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीयांची फसवणूक करत रशिया-युक्रेन युद्धात त्यांना लोटल्याप्रकरणी सीबीआयने 4 जणांना अटक केली आहे. या आरोपींपैकी तीन जण भारतीय नागरिक आहेत. तर एक जण रशियाच्या संरक्षण मंत्रालयात काम करणारा अनुवादक आहे. या आरोपींना 24 एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. परंतु याची माहिती आता समोर आली आहे.

Advertisement

आरोपींमध्ये अरुण आणि  येसूदास हे तिरुअनंतपुरम येथील रहिवासी आहेत. एंथनी इलांगोवन हा मुंबईचा तर निजिल जोबी बेनसाम हा रशियाच्या संरक्षण मंत्रालयात कार्यरत आहे. हे सर्वजण एका नेटवर्कचा हिस्सा असून यात सोशल मीडियाद्वारे भारतीयांना नोकरी आणि चांगल्या पगाराचे आमिष दाखवून फसविले जात होते. याकरता स्थानिक एजंट्सची देखील मदत घेतली जात होती.

दुबईपासून रशियात फैलावले नेटवर्क

रशियन अनुवादक या नेटवर्कचा महत्त्वाचा हिस्सा होता. तो भारतीयांना रशियाच्या सैन्यात भरती करण्याचे काम करत होता. तर एंथनी दुबईत फैजल बाबा आणि रशियातील स्वत:च्या सहकाऱ्यांसोबत मिळून भारतीयांसाठी व्हिसा तसेच विमानप्रवासाचे तिकीट मिळवून देण्याचे काम करायचा. अरुण आणि येसूदास हे स्थानिक एजंट होते, ते लोकांना रशियात नोकरी आणि गलेलठ्ठ पगाराचे आमिष दाखवत होते अशी माहिती सीबीआयने दिली आहे. सीबीआयनुसार त्यांनी काही खासगी व्हिसा सल्लागार कंपन्या आणि एजंट्सच्या विरोधात मानवतस्करीप्रकरणी गुन्हा नोंदविल आहे. संबंधित नेटवर्क अनेक देशांमध्ये फैलावलेले आहे. दिल्लीतील एका व्हिसा सल्लागार कंपनीने आतापर्यंत सुमारे 180 भारतीयांना रशियात पाठविले आहे. सध्या या भारतीयांना मायदेशी परत आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सीबीआयकडून सांगण्यात आले.

युट्यूब व्हिडिओद्वारे आमिष

व्हिसा सल्लागार कंपन्या या विदेशात नोकरी करू इच्छिणाऱ्या लोकांना लक्ष्य करत होत्या. या लोकांची दिशाभूल करण्यासाठी युट्यूब व्हिडिओ तयार केले जात होते. रशियात युद्धाचा कुठलाही प्रभाव नाही आणि सर्व जण सुरक्षित असल्याचा आभास घडवून आणला जात होता. यानंतर रशियाच्या सैन्यात मदतनीस, क्लार्क आणि धोकादायक इमारती रिकामी करविण्याचे काम करावे लागणार असल्याचे सांगण्यात येत होते. नोकरी स्वीकारणाऱ्या लोकांना सीमेवर युद्ध लढण्यासाठी पाठविले जाणार नाही तसेच 3 महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल आणि त्यादरम्यान 40 हजार रुपयांचे वेतन दिले जाईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर पगार एक लाख रुपये होणार असल्याचे व्हिडिओद्वारे सांगण्यात येत होते.

...तर 10 वर्षांची शिक्षा

आमिषाला बळी पडून भारतीय रशियात पोहोचल्यावर त्यांना बळजबरीने सैन्यप्रशिक्षण दिले जाते. त्यांना खोटी दस्तऐवज दाखविले जायचे, ज्यावर रशियाच्या सैन्यात सामील न झाल्यास 10 वर्षांची शिक्षा होणार असे नमूद असायचे. भारतीयांना रशियाच्या सैनिकांच्या बरोबरीने लढण्यासाठी भाग पाडले जात होते. रशियाच्या कंपन्यांनी या भारतीयांना मदतनीस म्हणून काम करण्यासाठी भरती करून घेतले होते. यानंतर रशियाचे खासगी सैन्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वॅगनर आर्मीत त्यांना सामील करविले जात युद्धभूमीवर पाठविले जायचे.

Advertisement

.