For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

4 नक्षलींचा खात्मा; जवान हुतात्मा

06:48 AM Jan 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
4 नक्षलींचा खात्मा  जवान हुतात्मा
Advertisement

छत्तीसगडमध्ये चकमक : घटनास्थळावरून एके-47, ‘एसएलआर’सारखी शस्त्रास्त्रे जप्त

Advertisement

► वृत्तसंस्था/ रायपूर

छत्तीसगडमधील दंतेवाडा आणि नारायणपूर जिल्ह्यांच्या सीमेवरील अबुझमदच्या जंगलात शनिवारी रात्री उशिरा सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या संघर्षात डीआरजी जवान हेडकॉन्स्टेबल सन्नू करम हुतात्मा झाले. त्याचवेळी जवानांनी एका महिलेसह 4 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. चकमकीनंतर सुरक्षा दलांनी शोध मोहिमेदरम्यान नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसह एके 47 आणि ‘एसएलआर’सारखी शस्त्रs जप्त केली. बस्तरचे पोलीस महासंचालक सुंदरराज पी यांनी या चकमकीला दुजोरा दिला आहे.

Advertisement

छत्तीसगडमधील 4 जिल्ह्यांमध्ये 1000 सैनिकांचा समावेश असलेली मोठी कारवाई सुरू करण्यात आली होती. याचदरम्यान दंतेवाडा आणि नारायणपूर जिह्यांच्या सीमेवरील अबुझमदच्या जंगलात शनिवारी रात्री उशिरा सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झडली. 3 जानेवारीला नारायणपूर, दंतेवाडा, जगदलपूर, कोंडागाव जिह्यातील डीआरजी आणि एसटीएफची संयुक्त पथके अबुझमद भागासाठी रवाना झाली होती. 4 जानेवारीच्या संध्याकाळी अबुझमदमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. मध्यरात्रीपर्यंत दोन्ही बाजूंनी अधूनमधून गोळीबार सुरू होता. रविवारी सकाळी या चकमकीबाबत नेमकी माहिती उघड करण्यात आली. त्यानुसार या संघर्षात चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच सुरक्षा दलाच्या एका जवानाला प्राणास मुकावे लागले.

जंगलातील रविवारी दुपारपर्यंतच्या शोध मोहिमेत 4 गणवेशधारी नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडल्याची माहिती बस्तर रेंजचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सुंदरराज पी यांनी दिली. त्यांच्याकडून एके 47 आणि एसएलआर सारखी स्वयंचलित शस्त्रs जप्त करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत दंतेवाडा विभागाचे डीआरजी जवान हेडकॉन्स्टेबल सन्नू करम हे हुतात्मा झाले. चकमकीनंतर पुन्हा रविवारी दिवसभर सुरक्षा दलांची शोधमोहीम सुरू होती. जवान अजूनही घटनास्थळी हजर आहेत.

गेल्या दीड वर्षात छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांना नक्षलवाद्यांविरोधात मोठे यश मिळाले आहे. या काळात 300 हून अधिक नक्षलवादी मारले गेले आहेत. सुमारे 1000 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली असून 837 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. गेल्यावर्षी 15 डिसेंबर रोजी छत्तीसगडच्या दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्तीसगड राज्य 2026 पर्यंत नक्षलमुक्त होईल, असा दावा केला होता. छत्तीसगड पोलीस कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पुरस्कार प्रदान करताना केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्यांच्या परिश्रम, समर्पण आणि शौर्याचे कौतुक केले होते.

चार दिवसातील दुसरी चकमक

चकमकीच्या दोन दिवस आधी गरियाबंद जिल्ह्यातील सोरनामाल जंगलात सुरक्षा दलांनी तीन नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. त्या कारवाईमध्ये छत्तीसगड आणि ओडिशाचे सुमारे 300 सैनिक सहभागी झाले होते. गरियाबंदचे पोलीस अधीक्षक निखिल राखेचा यांनी या चकमकीला दुजोरा दिला होता. ही चकमक नक्षलग्रस्त भागात सुरक्षा दलांकडून सातत्याने केल्या जात असलेल्या कारवाईचा एक भाग होता. अशा कारवायांमध्ये सुरक्षा दलाचे जवान नक्षलवाद्यांच्या मुख्य भागात घुसून त्यांना घेरून ठार मारत आहेत.

छत्तीसगडच्या चार जिल्ह्यांमध्ये 1000 जवानांची कारवाई

अबुझमदच्या घनदाट जंगलात नक्षलवाद्यांशी जोरदार संघर्ष

सुरक्षा दल : दंतेवाडा, नारायणपूर, कोंडागाव आणि बस्तर जिल्ह्यातील डीआरजी आणि एसटीएफ संघ सहभागी.

सैनिकांची संख्या : सुमारे 1,000 सैनिकांनी नक्षलवाद्यांच्या मुख्य भागाला वेढा घातला होता.

चकमकीचा परिणाम : 4 नक्षलवादी ठार झाले. सैनिकांनी नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि शस्त्रs जप्त केली.

Advertisement
Tags :

.