मणिपूरमध्ये 4 उग्रवाद्यांचा खात्मा
सैनिकांच्या दिशेने उग्रवाद्यांनी केला होता गोळीबार
वृत्तसंस्था/ चुराचांदपूर
मणिपूरच्या चुराचांदपूरमध्ये सुरक्षा दलांनी प्रतिबंधित गटाच्या 4 उग्रवाद्यांना कंठस्नान घातले आहे. चारही उग्रवादी मंगळवारी सकाळी झालेल्या चकमकीत मारले गेले आहेत. या उग्रवाद्यांचा संबंध मणिपूरमधील प्रतिबंधित संघटना युनायटेड कूकी नॅशनल आर्मीशी (युकेएनए) होता. खानपी गावानजीक उग्रवादी असल्याची माहिती सुरक्षादलांना मिळाली होती. या पार्श्वभूमीवर पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास परिसरात शोधमोहीम हाती घेण्यात आली. यादरम्यान सुरक्षादल आणि उग्रवाद्यांदरम्यान चकमक झाली आणि यात 3 उग्रवादी मारले गेले आहेत.
मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांच्या अंतर्गत अनेक कूकी आणि जोमी उग्रवादी समुहांनी पेंद्र सरकार आणि राज्य सरकारसोबतच्या करारावर स्वाक्षरी केली होती. परंतु या यादीत युकेएनएचे नाव सामील नव्हते.
सुरक्षा दलांनी दिलेल्या प्रत्युत्तरात अनेक उग्रवादी जखमी झाले आणि यातील 4 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर गोळीबारादरम्यान अनेक उग्रवादी तेथून पसार होण्यास यशस्वी ठरले आहेत. या पलायन केलेल्या उग्रवाद्यांचा शोध घेण्यासाठी सैन्याने मोहीम हाती घेतली असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.