भारत-ऑस्ट्रेलिया युवा संघांत 4 सामन्यांची हॉकी मालिका
वृत्तसंस्था, भोपाळ
18 वर्षांखालील भारताच्या पुरुष आणि महिला युवा हॉकी संघ ऑस्ट्रेलियाच्या 18 वर्षांखालील पुरूष आणि महिला युवा हॉकी संघाबरोबर 15 ते 20 मे दरम्यान प्रत्येकी 4 सामन्यांची हॉकी मालिका खेळणार आहे. हे सामने येथील उद्धवदास मेहता क्रीडा केंद्राच्या मैदानावर होतील.
या हॉकी मालिकांसाठी भोपाळमधील साई केंद्रात 19 एप्रिलपासून भारताच्या 18 वर्षांखालील वयोगटातील पुरूष आणि महिलांच्या हॉकी संघांसाठी राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. चालु महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या 18 वर्षांखालील वयोगटाच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेसाठी आतापासूनच पूर्वतयारीला प्रारंभ करण्यात आला आहे.
भारताच्या 18 वर्षांखालील वयोगटातील महिलांचा हॉकी संघ ऑस्ट्रेलियाच्या महिला हॉकी संघाबरोबर चार सामन्यांची हॉकी मालिका खेळणार आहे. या मालिकेला 15 मे पासून प्रारंभ होईल. या मालिकेतील दुसरा सामना 17 मे रोजी, तिसरा सामना 18 मे रोजी तर चौथा आणि शेवटचा सामना 20 मे रोजी होणार आहे.
भारताच्या 18 वर्षांखालील पुरूष हॉकी युवा हॉकी संघाच्या ऑस्ट्रेलियाबरोबरच्या सामन्यांना 15 मे पासून प्रारंभ होईल. या मालिकेतील दुसरा सामना 17 मे रोजी, तिसरा सामना 18 मे आणि शेवटचा सामना 20 मे रोजी होईल. भोपाळमध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रशिक्षण सराव शिबिरात पुरूष संघाचे प्रशिक्षक सरदार सिंग यांचे बहुमोल मार्गदर्शन हॉकीपटूंना लाभले. तसेच महिला हॉकी संघाची प्रशिक्षक राणी रामपालने या सराव शिबिरात भारतीय महिला युवा हॉकी संघाला मार्गदर्शन आणि महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत.