वृक्ष दुर्घटनेतील मृत तरुणीच्या कुटुंबियांना 4 लाखांची मदत
विधानसभेत घोषणा : मुख्यमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त
पणजी : येथील चर्च चौकात रविवारी सकाळी एक भलामोठा वृक्ष अंगावर कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आरती गौंड (19) या तरुणीच्या कुटुंबियांना 4 लाख ऊपये मदत जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी विधानसभेत ही घोषणा केली. सोमवारी विधानसभा कामकाज प्रारंभ होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी सदर तरुणीच्या अपघाती मृत्युबद्दल विधानसभेत माहिती दिली व त्यासाठी सर्व गोमंतकीयांच्या वतीने आपण त्या तऊणीच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असल्याचे सांगितले.
एखाद्या व्यक्तीच्या जीवनाची किंमत पैशाने करता येत नसली तरीही केवळ एक मदत म्हणून आपण मुख्यमंत्री आधार निधीतून तिच्या कुटुंबियांना 4 लाख रुपये मदत देत असल्याचे ते म्हणाले. उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून ही मदत त्या तऊणीच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचविण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या मुसळधार आणि वादळी पावसामुळे विविध भागांमध्ये जीर्ण झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडत आहेत. अशी झाडे किंवा फांद्या स्थानिकांची घरे, वाहनांवर पडत असल्यामुळे त्यांचे लाखो ऊपयांचे नुकसान होत आहे. अशातच रविवारी संततधार पावसामुळे राजधानीतील चर्च चौकात अंगावर झाड कोसळून आरतीचा मृत्यू झाला होता.
धोकादायक वृक्ष तोडणार
दरम्यान, त्यानंतर याच विषयाशी संबंधित मुद्यावरून पुन्हा झालेल्या चर्चेवेळी रस्त्याबाजूच्या जुनाट तसेच कोसळण्याच्या स्थितीत असलेल्या धोकादायक वृक्षांबद्दल भीती व्यक्त करण्यात आली. असे वृक्ष कापून हटविणे हे पंचायत, पालिकांचे काम असते. परंतु हल्ली बरेच कथित पर्यावरणप्रेमी निर्माण झाले आहेत. त्यातून एखादा धोकादायक वृक्ष सुद्धा हटवायचा म्हटला तरीही ते विरोध करतात, प्रसंगी न्यायालयातही जातात. त्यामुळे इच्छा असूनही सरकारला काहीच करता येत नाही. परिणामी धोका तसाच राहतो, असे मत आमदार मायकल लोबो यांच्यासह अन्य सदस्यांकडून व्यक्त करण्यात आले. दुसऱ्या बाजूने संबंधित भाटकारही अशी झाडे तोडण्यास विरोध करतात, हेही सभागृहाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
गांभीर्याने उपाय काढणे क्रमप्राप्त!
सध्या कोसळणाऱ्या मुसळधार पावसात राज्याच्या विविध भागात घरे, वाहने, व्यक्ती यांच्यावर झाडे कोसळण्याच्या झालेल्या दुर्घटना आणि त्यातील हानीचा अंदाज घेता आता त्यावर गांभीर्याने उपाय काढणे क्रमप्राप्त ठरले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. यापुढे एखाद्याच्या घराजवळ धोकादायक स्थितीत असलेले झाड किंवा फांदी सुद्धा तोडायची झाल्यास त्यासंबंधी स्थानिक लोकप्रतिनिधीनी उपजिल्हाधिकाऱ्यांना माहिती द्यावी. उपजिल्हाधिकारी तत्काळ पाहणी करून त्यासंबंधी निर्णय घेतील. त्यासाठी प्रसंगी अग्निशामक दलाची सुद्धा मदत घेऊन सदर धोका दूर करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.