कलखांबमध्ये 4 लाखांची घरफोडी
सोन्या-चांदीचे दागिने चोरट्यांनी लांबविले
बेळगाव : बंद घराचा कडीकोयंडा तोडून सुमारे 4 लाखांचे दागिने चोरट्यांनी पळविले आहेत. सोमवारी सायंकाळी कलखांब, ता. बेळगाव येथे चोरीचा हा प्रकार उघडकीस आला आहे. रात्री मारिहाळ पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आदित्य बसाप्पा बायाण्णावर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती समजताच मारिहाळचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर सी. व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसेतज्ञांचा पाचारण करण्यात आले.
आदित्य व त्यांचे कुटुंबीय रविवार दि. 1 सप्टेंबर रोजी रात्री आपल्या घराला कुलूप लावून संकेश्वरजवळील हेब्बाळला गेले होते. सोमवारी दुपारी 4 वाजता घरी परतले. त्यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला असून तिजोरीतील दागिने पळविले आहेत. 50 ग्रॅम 200 मिली सोने, 15 तोळे चांदी असा सुमारे 4 लाखांचा ऐवज पळविला आहे. आदित्य यांचे वडील राज्य राखीव पोलीस दलात साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. घरात कोणी नसताना चोरट्यांनी डाव साधला आहे. मारिहाळ पोलीस पुढील तपास करीत आहेत.