पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर गोळीबारात 4 ठार
शांतता चर्चेनंतर अवघ्या 48 तासांत हल्ला
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद, काबूल
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील चमन-स्पिन बोल्दाक सीमेवर शुक्रवारी रात्री पुन्हा जोरदार गोळीबार झाला. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला गोळीबार रात्री उशिरापर्यंत सुरू राहिला. दोन्ही देश हल्ला सुरू केल्याबद्दल एकमेकांवर आरोप करत आहेत. या गोळीबारात चार अफगाण नागरिक ठार झाले असून अन्य सहाजण जखमी आहेत. दोन्ही देशांदरम्यान एकीकडे शांतता चर्चा सुरू असतानाच पुन्हा सीमेवर तणाव वाढल्याचे दिसून येत आहे. दोन्ही देशांमधील शांतता चर्चा 48 तासांपूर्वीच झाली होती. तथापि, या चर्चा अनिर्णीत असून कोणताही अंतिम तोडगा निघालेला नाही. पाकिस्तान पूर्णपणे सतर्क असून आपल्या सीमा आणि लोकांचे रक्षण करण्यास तयार असल्याचे लष्करी प्रवक्त्यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानने कंदहार प्रांतातील स्पिन बोल्दाक भागात पहिला हल्ला केल्यामुळे त्यांच्या सैन्याला प्रत्युत्तर देणे भाग पडले, असे अफगाण तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी म्हटले आहे. दुसरीकडे,अफगाण सैन्याने चमन सीमेवर कोणत्याही चिथावणीशिवाय गोळीबार सुरू केल्यामुळे पाकिस्तानी सैन्याला प्रत्युत्तर द्यावे लागले, असा पाकिस्तानी अधिकाऱ्यांचा दावा आहे.
सौदी अरेबियामध्ये शांतता चर्चा
सौदी अरेबियामध्ये 2-4 डिसेंबर रोजी झालेल्या दोन्ही देशांमधील शांतता चर्चेच्या तिसऱ्या फेरीचा कोणताही निकाल न लागता संपल्यानंतर ही ताजी चकमक घडली आहे. दोन्ही बाजूंनी युद्धबंदी कायम ठेवण्याचे आश्वासन दिले असले तरी तणाव कायम आहे. दोन्ही शिष्टमंडळे 4 डिसेंबर रोजी सौदी अरेबियाहून परतल्यानंतर 5 डिसेंबरच्या रात्री पुन्हा गोळीबार सुरू झाला. यापूर्वी कतार आणि तुर्कीमध्येही शांतता चर्चा झाल्या आहेत. आता चौथी फेरी कधी आणि कुठे होईल याची तारीख निश्चित झालेली नाही.