गुजरातमध्ये 4 आयएस दहशतवाद्यांना अटक
अहमदाबाद विमानतळावर एटीएसची कारवाई : चौघेही श्रीलंकन नागरिक
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
गुजरात एटीएसने अहमदाबाद विमानतळावरून ‘आयएसआयएस’च्या चार दहशतवाद्यांना अटक केली आहे. चारही दहशतवादी श्रीलंकेचे नागरिक आहेत. तपास यंत्रणांनी सध्या चार दहशतवाद्यांना अज्ञातस्थळी नेले असून त्यांची चौकशी सुरू केली आहे. अहमदाबाद विमानतळावर दहशतवादी कोणत्या उद्देशाने आले होते, याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.
अटक करण्यात आलेले चारही आयएस दहशतवादी देशात मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट रचत होते. हे दहशतवादी श्रीलंकेतून चेन्नईमार्गे अहमदाबादला पोहोचल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यांच्याकडे पाकिस्तानी बनावटीची शस्त्रे सापडल्याचे सूत्रांनी सांगितले. गुजरात एटीएसने या चार दहशतवाद्यांना लक्ष्य केलेल्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच अटक केली. हे दहशतवादी पाकिस्तानातून त्यांच्या हॅण्डलरच्या आदेशाची वाट पाहत होते, अशीही माहिती मिळाली आहे. हे दहशतवादी अहमदाबादमध्ये पोहोचल्यानंतर गुजरात पोलीस अलर्ट मोडमध्ये आले आहेत. आयपीएल 2024 चा पहिला क्वालिफायर सामना अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे. त्यामुळे विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था कडेकोट आहे. मात्र या सामन्याआधी एटीएसला मोठे यश मिळाले आहे. आयपीएलचे सामने पाहण्यासाठी सध्या शौकिनांची मोठी गर्दी उसळत आहे. या गर्दीचा फायदा उठवत घातपात करण्याचा दहशतवाद्यांचा इरादा होता काय? याचा तपास केला जात आहे.
गुजरात एटीएसने यापूर्वी एका गुप्त कारवाईत आयएस खोरासानशी संबंधित पाच जणांना ताब्यात घेतले होते. त्याचवेळी तिघे जण अफगाणिस्तान आणि पोरबंदर सागरी मार्गाने इराणला जाण्याच्या बेतात असल्याची माहिती गुजरात एटीएसला मिळाली. माहितीच्या आधारे, गुजरात एटीएसने पोरबंदरमध्ये छापा टाकून श्रीनगरमधील उम्मेद मीर, हनान शोल आणि मोहम्मद हाझीम नावाच्या तीन संशयितांना पोरबंदर रेल्वे स्थानकावरून अटक करत आयएसच्या इंडिया मॉड्यूलचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर आता चौघांना अटक करून गुजरात एटीएसने आणखी एक मोठी कारवाई केली आहे.