For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कामतगानजीक राष्ट्रीय मार्गावर कार अपघातात चौघे जखमी

11:59 AM Nov 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
कामतगानजीक राष्ट्रीय मार्गावर कार अपघातात चौघे जखमी
Advertisement

वार्ताहर/गुंजी

Advertisement

राष्ट्रीय महामार्गावरील कामतगानजीक असलेल्या पुलावर सदोष रस्ता कामामुळे कार पलटी होऊन झालेल्या अपघातात एक किरकोळ तर तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान घडली. सध्या बेळगाव-पणजी महामार्गाचे काम सुरू असून, अनेक ठिकाणी अर्धवट कामे आहेत. त्यामध्ये कामतगा व जोमतळा गावांच्या मधोमध असलेल्या महामार्गावरील पुलावर गतिरोधकाप्रमाणे उंचवटे असल्याने भरधाव येणाऱ्या वाहनचालकांना याची कल्पना येत नसल्याने शिवाय त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा सूचना फलकही नसल्याने यावरून वाहने उडून पडत आहेत. त्यामुळे सदर ठिकाणी अनेक अपघात घडत असल्याचे प्रवाशांतून बोलले जात आहे.

रविवारीही अशाच प्रकारे एक कार खानापूरहून गोव्याच्या दिशेने जात असताना या पुलावरील त्या उंचवट्यामुळे सदर कार पलटी झाली. मात्र केवळ दैव बलवत्तर म्हणूनच पुलावरून खाली कोसळता कोसळता बचावली आहे. मात्र अनर्थ टळला असला तरी त्यामध्ये असलेले प्रवासी या अपघातात जखमी झाले. सदर जखमी प्रवासी सांगलीचे असून  त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णवाहिकेतून खानापूरला नेण्यात आले. या अपघातात रस्त्यावरील गतिरोधकाप्रमाणे असलेले उंचवटे कारणीभूत ठरवले जात आहेत. कंत्राटदाराने सदर ठिकाणी व्यवस्थित रित्या सपाटीकरण करणे गरजेचे असल्याचे वाहन चालक व प्रवाशातून बोलले जात आहे. या कारणास्तव गेल्या महिन्याभरात या ठिकाणी सात-आठ किरकोळ अपघात घडले असूनसुद्धा त्या डागडुजीची दखल घेतली नाही.

Advertisement

Advertisement
Tags :

.