इराणमध्ये अपहरण झालेले 4 भारतीय मायदेशी परतले
डंकी मार्गाने ऑस्टेलियाला जाताना अपहरण
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
इराणमध्ये ओलीस ठेवण्यात आलेल्या 4 भारतीयांची मायदेशात वापसी झाली आहे. हे चारही जण अवैध मार्गाने ऑस्ट्रेलियात जात होते. याचदरम्यान इराणच्या तेहरान विमानतळावरून त्यांचे अपहरण करण्यात आले होते. अपहरणकर्त्यांनी त्यांना ओलीस ठेवत कुटुंबीयांकडे 4 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. चारही भारतीय मंगळवारी सकाळी दिल्लीत पोहोचले आहेत. आता रेल्वेने ते गुजरात येथे पोहोचणार आहेत. भारत सरकारच्या मदतीने चारही जण सुखरुप परतले आहेत. अपहरणकर्त्यांकडून व्हिडिओ पोस्ट करण्यात आल्यावर भारताच्या सूचनेनुसार इराण सरकारने चारही भारतीयांची मुक्तता करविली होती.
अपहरणकर्त्यांनी या चारही जणांच्या परिवारांना फोन करत 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. परिवाराला एक व्हिडिओ पाठविण्यात आला होता, ज्यात अपहृतांना दाखविण्यात आले होते. गुजरातमधील एका एजंटने या भारतीयांना ऑस्ट्रेलियात अवैध मार्गाने पाठविण्यासाठी रक्कम उकळली होती.