यू-19 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताला 4 सुवर्णपदके
पहिल्याच यू-19 बॉक्सिंग स्पर्धेत मिळविली एकूण 14 पदके
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पार्थवी ग्रेवाल, वंशिका गोस्वामी व हेमंत सांगवान यांनी येथे झालेल्या पहिल्या यू-19 वर्ल्ड चॅम्पियनशिप बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदके पटकावली. अमेरिकेतील कोलोरॅडो येथे वर्ल्ड बॉक्सिंग फेडरेशनने आयोजित केलेल्या स्पर्धेत भारताने एकूण 17 पदकांची कमाई केली. भारताच्या महिला बॉक्सर्सनी लक्षवेधी कामगिरी करीत एकूण दहा पदके पटकावली. पार्थवी ग्रेवालने महिलांच्या 65 किलो गटाच्या अंतिम लढतीत नेदरलँड्सच्या आलिया होपेमावर 5-0 असा एकतर्फी विजय मिळवित सुवर्ण पटकावले तर वंशिकाने महिलांच्या 80 किलोवरील गटात जर्मनीच्या व्हिक्टोरिया गॅटवर विजय मिळविला. रेफरींनी ही लढत एक मिनिट 37 सेकंदानंतर थांबवली. हेमंतने पुरुष विभागातील एकमेव सुवर्ण मिळविताना 90 किलो गटात अमेरिकेच्या रिशॉन सिम्सवर 4-1 असा विजय मिळविला. याशिवाय निशा (51 किलो गट), सुप्रिया देवी थॉकचोम (54 किलो), कृतिका वासन (80 किलो) यांना मात्र अंतिम लढतीत पराभूत व्हावे लागल्याने त्यांना रौप्यपदकांवर समाधान मानावे लागले. खेलो इंडियामध्ये सहभागी झालेल्या 11 खेळाडूंचा पदके मिळविणाऱ्यांत प्रमुख सहभाग होता, त्यापैकी आठ खेळाडू साई नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये ट्रेनिंग घेत आहेत. साई केंद्रातील तीन खेळाडूंनी पदके मिळविली.
पदकविजेते खेलो इंडियातील खेळाडू : मुले-सुमित, लक्षय राठी, कृश पाल, आर्यन, रिषी सिंग. मुली-कृशा वर्मा, चंचल चौधरी, निशा, विनी, आकांशा फळसवाल, सुप्रिया देवी. पदके मिळविणारे खेळाडू-सुवर्ण : कृशा वर्मा, पार्थवी ग्रेवाल, वंशिका गोस्वामी, हेमंत सांगवान. रौप्य : निशा, सुप्रिया देवी थॉकचोम, कृतिका वासन, चंचल चौधरी, अंजली सिंग, विनी, आकांशा फळसवाल, राहुल कुंडू. कांस्य : रिषी सिंग, कृश पाल, सुमित, आर्यन, लक्षय राठी.